Tuesday, 12 April 2022

 


भाषण करताना आपले भाषण प्रभावी व्हावे यासाठी निवेदकाने काही पथ्ये पाळायची असतात. त्याचप्रमाणे, वक्त्याच्या काही जबाबद-याही असतात. भाषण करत असताना त्यात काय असावे आणि काय टाळावे याचाही विचार केलेला असावा. या सगळ्याची सविस्तर माहिती
आपल्याला 

ग्राहकराजा प्रशिक्षण कार्यक्रमात अजित वाराणशीवार सरांच्या

 केलेल्या रसाळ, ओघवत्या वाणीतून या व्याख्यानमालेत ऐकायला मिळाली. त्यांच्या व्याख्यानातील काही महत्त्वाचे मुद्दे इथे संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न!


भाषणकला

(श्री. अजित वाराणशीवार)

      ‘भाषणकला’ हा विषय ऐकला आणि असे वाटले की अरे वा अगदी सोपा विषय आहे. न नाही, भाषण करता येणे ह देखील एक कला आहे त्यामुळेच यला ‘भाषणकला’ असे म्हटले आहे. मला वाटत की आपल्याकडे जे अनेक थोर संत होऊन गेले उदा. नामदेव, तुकाराम, गाडगेबाबा, ज्ञानेश्वर..... अगदी कुठलाही संत डोळ्यासमोर आणा... मला वाटत की, हे सगळे उत्तम भाषण करणारे वक्तेच होते. कारण भाषण करण्यासाठीचे सगळे गुण त्यांच्यात एकवटलेले आपल्याला दिसतात. अजित सरांनी जे जे मुद्दे सांगितले ते ते सगळे यांच्या ठायी आपल्याला दिसू शकतात आणि म्हणूनच समाज उद्धाराचं, समाज साक्षरतेचं काम प्रभावीपणे हे सगळेजण करू शकले. कसे ते आपण पुढे बघू या.

भाषण करताना आपले भाषण प्रभावी व्हावे यासाठी निवेदकाने काही पथ्ये पाळायची असतात. त्याचप्रमाणे, वक्त्याच्या काही जबाबद-याही असतात. भाषण करत असताना त्यात काय असावे आणि काय टाळावे याचाही विचार केलेला असावा. या सगळ्याची सविस्तर माहिती आपल्याला अजितसरांच्या केलेल्या रसाळ, ओघवत्या वाणीतून या व्याख्यानमालेत ऐकायला मिळाली आहे. त्यांच्या व्याख्यानातील काही महत्त्वाचे मुद्दे इथे संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न!

      सर्वात प्रथम आपण बघूया की भाषण करणारा वक्ता कसा असावा? कारण कार्यक्रमाचा सर्व डोलारा हा वक्त्यावरच अवलंबून असतो. त्यामुळे भाषणकर्त्याच्या अंगी नेमके कोणते गुण असावेत ते आपण बघू या.

निवेदक कसा असावा :

१.      निवेदकाची देहबोली.  

२.      निवेदक ‘प्लस्टिक मोल्ड’ सारखा असावा.

३.      निवेदक काचेसारखा पारदर्शी असावा

४.      सर्व जात, धर्म, भाषा, प्रांत यांचा आदर करणारा असावा.

५.      दुस-याच्या विचारांचा आदर करणारा असावा.

थोडक्यात, वक्ता हा प्रसन्न, हस-या चेहे-याचा असावा. त्याने भाषण करताना खूप हातवारे करणे किंवा अगदी मख्ख, स्तब्ध उभे राहून निवेदन करणे टाळले पाहिजे. वक्त्याची नजर चौफेर फिरत असावी. त्यामुळे श्रोत्यांना वक्ता आपल्याकडे बघतो आहे, आपल्याशी बोलतो आहे असे वाटते,  वक्त्याशी त्यांची नाळ पटकन जुळली जाते. निवेदक हा ‘प्लस्टिक मोल्ड’ सारखा असावा म्हणजेच कार्यक्रमाच्या वेळी अचानक काही प्रसंग तिथे घडला, किंवा आयत्यावेळी काही बदल झाला त्री त्याचा अतिशय चतुराईने, खुमासदारपणे आपल्या भाषणात उल्लेख करून श्रोत्यांना खिळवून ठेवने त्याला जमले पाहिजे, त्यामुळे आयत्यावेळी वक्त्याला आपल्या भाषणात हवा तसा बदल त्याला करता येणे आवश्यक आहे. आपल्या भाषणाला त्याने स्थल-काल-प्रसंगानुरूप वेगवेगळे आयाम देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तो काचेसारखा ‘पारदर्शी’ असावा. त्याने कोणताही पूर्वग्रह मनांत धरून भाषण करू नये. ‘स्व’ मताला प्राधान्य देऊन तेच कसे बरोबर आहे असे दाखवण्याचा प्रयत्न करु नये. तो सर्व धर्म, जाती, भाषा, प्रांत यांचा आदर करणारा असावा. दुस-यांच्या मताचाही आदर करून आपल्या मताची योग्य शब्दांत मांडणी करता येणारा वक्ता हा खरं श्रेष्ठ वक्ता असे म्हणायला हरकत नाही. पण हे करत असताना वक्त्याने आपल्या मताबद्दल आग्रही नसावं व असा समन्वय साधणे अत्यंत आवश्यक आहे.

      भाषणकर्त्याचं बोलणंहे अगदी साखर पेरणीप्रमाणे असावं. म्हणजेच वक्ता आपल्या भाषणातून जे काही बोलतो आहे त्याचं वजन, त्याची छाप समोरच्या श्रोत्यांवर पडली पाहिजे. भाषणाची मांडणी सोप्या भाषेत, दैनंदिन व्यवहारातील उदाहरणांसह, अभ्यासपूर्ण असेल तर वक्त्याचे भाषण अतिशय प्रभावी होऊ शकते. 

      आत्ता आपण बघितले की भाषण करणारा वक्ता कसा असावा. आता आपण बघूया की वक्त्याचे भाषण कसे असावे.  

भाषण करतांना हे लक्षात ठेवावे.

·         निवेदन सचित्र आसवे.

·         सूत्रसंचालनाची मांडणी सोप्या पद्धतीची असावी.

·         व्यक्तीला मोठे करण्याचा प्रयत्न असावा.

·         वेदनादायी निवेदन नसावे.

·         पांचटपणा नसावा.

·         कोणत्याही व्यंगावर भाष्य नसावे.

·         थोरांच्या विचारांवर भाष्य नसावे.

·         पाल्हाळ नसावे, रटाळ नसावे.

      या वरून आपल्याला असे लक्षात येते की, भाषण हे सचित्र असावे. म्हणजेच, वक्ता भाषण करत असतांना श्रोत्यांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग, ते स्थळ उभे राहिले पाहिजे. एवढे प्रभावी भाषण करण्याची ताकद वक्त्यात असणे गरजेचे आहे. अतिशय सोप्या शब्दांत, ओघवत्या वाणीत विषयाची मांडणी करणे आवश्यक आहे. आपल्याकडे संत परंपरा खूप मोठी आहे. परंतु ज्याप्रमाणे कोणत्याही संताने अवजड, बोजड, अलंकारिक भाषा न वापरता साध्या, सोप्या, अगदी अडाणी माणसालाही कळेल अशा शब्दांत वाड्मयाची निर्मिती केली त्याचप्रमाणे भाषणाची भाषा सोपी सरळ असेल तर श्रोतृवर्गदेखील भाषणात रममाण होतून जातो. आजही ज्ञानेश्वरी वर पी.एच.डी. करणारे अनेक जण आहेत कारण आतिशय सोप्या, बोली भाषेत ज्ञानेश्वरांनी ती लिहिली आहे त्यामुळे ती अगदी अशिक्षित माणसाला देखील कळायला सोपी जाते. याबरोबरच वक्त्याच्या भाषणात आत्मप्रौढी नको. स्वत:ला, स्वमताला, अतिम्हत्त्व दिले जात नाहीये ना, याकडे बारकाईने लक्ष असणे व या गोष्टी कटाक्षाने टाळणे अत्यावश्यक असते. वक्त्याने आपल्या भाषणातून कार्यक्रम ज्या संस्थेचा, व्यक्तीचा असेल तिला मोठे करणे आवश्यक असते.

      भाषण करतांना वक्त्याने ते वेदनादायी करू नये, म्हणजेच खूप खोचक बोलणे वा कुणाच्या तरी शारिरीक व्यंगावर टीका करणे, पांचट विनोद करणे या गोष्टी टाळायला हव्यात. थोर व्यक्तींच्या विचारांवर वक्त्याने ‘स्व’ मतांचे प्रदर्शन करणे टाळले पाहिजे.

भाषणाची पथ्ये :

१.      भाषा

२.      वाणी

३.      श्रोत्यांना गृहीत धरु नये

४.      दुस-यांच्या विचारांचा आदर

५.      एकेरी उल्लेख नकरता आदरयुक्त उल्लेख असावा

 

भाषणकर्त्या वक्त्याची वाणी शुद्ध असावी. कर्त्याचा अक्षरांचा उच्चार स्पष्ट असावा. ‘श’, ‘ष, ‘स’, ‘न’, ‘ण’, ‘ल’, ‘ळ’ यासारख्या अक्षरांचे, ‘पाणी’, ‘आणि’ अशा सारख्या शब्दांचे उच्चार स्पष्ट असावेत. शब्दांची निवड, मांडणी ही सोपी असावी. फार अवघड, अवजड शब्द न वापरता सोप्या परंतु चपखल शब्दांची निवड करावी. भाषण करतांना खूप मोठी, लांबलचक वाक्यरचना न करता छोटी छोटी वाक्य असावीत. शैलीदार वाक्यरचना जरूर असावी परंतु, जसे आपण सण - समारंभालाच दागिने घालतो त्याचप्रमाणे आवश्यक तेथेच शैलीदार वाक्यरचना असावी. वक्त्याची वाणी ही मधुर, रसाळ व विनम्र असावी. अजितसरांनी सांगितल्याप्रमाणे ती ‘गुळगुळीत रस्त्या’ प्रमाणे असावी म्हणजेच ओघवती, सहज, सोपी असावी. कोणत्या शब्दावर किती जोर, वजन द्यायचे याचे ज्ञान वक्त्याला असावे. ‘मधाळ’ वाणीमुळे आपले भाषण ‘रटाळ’ होत नाहीये ना याचे भान वक्त्याला असावे. भाषण करतांना वक्त्याने श्रोत्यांना अजिबात गृहीत धरू नये. त्याचप्रमाणे कोणत्याही व्यक्तीसंदर्भात बोलतांना एकेरी उल्लेख न करता आदरयुक्त उल्लेख करावा.

भाषणकर्त्याच्या जबाबद-या :

१.      अभ्यासपूर्ण भाषण असावे

२.      पाल्हाळ न लावता भाषण वेळेत संपविणे

३.      परिस्थितीचे भान

४.      विशेषणांचा वापर

भाषणाच्या आधी वक्त्याने संयोजक अथवा नियोजकांकडून पुरेसा अवधी मागून घेऊन त्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा, संस्था / व्यक्तीसंदर्भातील संपूर्ण माहिती समजावून घेणे, तो कार्यक्रम करण्यामागचा विचार, भावना काय आहेत हे लक्षात घेऊन त्याचा पूर्ण अभ्यास करून स्वत:च्या हस्ताक्षरातील टिपणी काढून मग कार्यक्रमासाठी सज्ज व्हावे.

आपले भाषण लांबत असेल तर ते वेळेत कसे पूर्ण करता येईल यासाठीची समयसूचकता व अनुभव वक्त्याकडे असणे आवश्यक आहे. कार्यक्रम खूपच कंटाळवाणा होत असेल तर त्यात आपल्या भाषणाच्या माध्यमातून खुमारी कशी आणता येईल, त्यासाठी कशाप्रकारे भाषण  करणे आवश्यक आहे, कोणते मुद्दे मांडणे योग्य ठरेल यासाठीची समयसूचकता वक्त्याकडे असणे आवश्यक आहे. भाषणामध्ये विषयाची मांडणी करतांना कार्यक्रमाची रंगत वाढवण्यासाठी प्रसंगानुरूप किस्से, कविता, चुटकुले, सुभाषिते, चारोळ्या यांची योग्य तिथे व योग्य प्रमाणात पेरणी करावी. भाषणातील किस्से, कविता, चुटकुले यामुळे भाषणाचा गाभाच हरवणार नाही ना याकडे वक्त्याने लक्ष द्यावे. अजितसरांनी वर्णन केल्याप्रमाणे ‘दोन गावांना जोडणारा पूल’ जसे काम करतो तसेच काम निवेदकाने करणे आवश्य आहे. नेमके, योग्य, अचूक निवेदन करून कार्यक्रम पुढे नेण्यातच निवेदकाचे कौशल्य असते. “मावळा मावळा जोडला महाराष्ट्र धर्म वाढविला” याप्रमाणे वक्त्याला आपल्या भाषण कौशल्याने एक एक श्रोता जोडून आपले विचार त्यांच्यापर्यंत प्रभावीपणे पोचवता आले पाहिजेत.

मंत्र छोटा, तंत्र सोपे, परी यशस्वी  ठरले ते

रीत साधी, शिस्त बांधी कार्य व्यापक उभऊ ते

व्यक्ती व्यक्ती जमवून भवती

जागृत करणे त्या प्रति

मनांत प्रीती,हृदयी भक्ती, सेवा करणे नि:स्वार्थी

हा मंत्र कोणत्याही वक्त्याने उरी बाळगला तर तो वक्ता नक्कीच मोठा होत राहील. त्याला त्याच्या भाषणासाठी कोणत्याही प्रकारे जाहिरात करून, आमिष दाखवून गर्दी कशी होईल याची व्यवस्था करण्याची गरज पडणार नाही. वक्ता लोकांमध्ये जेवढा प्रिय तेवढाच तो मोठा वक्ता !
 

वक्त्याने भाषण करतांना आदरणीय, पूजनीय, परमपूज्य, ऋषीतुल्य अशा विशेषणांचा वापर करतांना काळजीपूर्वक करावा. एखद्या ठिकाणी वक्त्यापेक्षा लहान परंतु समाजात जर त्या व्यक्तीचा अधिकार खूप मोठा असेल तर अशी व्यक्ती असल्यास त्या व्यक्तीला योग्य सन्मान देणे हे वक्त्याचे कर्तव्य आहे.

      मला वाटते या सर्व गोष्टींचा काळजीपूर्वक विचार केळ गेलं तर वक्त्याला भाषण देताना अजिबात दडपण येणार नाही. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वर माउलींनी ही ‘प्रभावी वक्ता’ आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण आपण आता वर भाषणकलेसाठी आवश्यक जे जे मुद्दे बघितले ते ते माउलींच्या ठायी आपल्याला दिसतात. इतक्या सोप्या शब्दांत, ओघवत्या, रसाळ वाणीत, दैनंदिन व्यवहारातील शब्द वापरून संस्कृतमधील गीता सांगितली कारण त्यामागे कारणच हे होतं की, समोर बसलेला, समाजातील तळागाळातील, अशिक्षित व्यक्तीपर्यंत पोचून त्याच्यापर्यंत चांगले विचार पोहोचावेत, त्याचं प्रबोधन व्हावं, त्यातूनच समाजाची प्रगती होणार आहे. माउलींनी देखील समाजोद्धारासाठी सोप्या शब्दात मांडणी, दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे, सचित्र वर्णन, शुद्ध कोणालाही न दुखावणारी वाणी या सगळ्या तंत्रांचाच वापर केलेला आपल्या दिसून येतो.

Sunday, 10 April 2022


 

ग्राहकराजा च्या माध्यमातून कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात कोल्हापूरच्या 

जुई कुलकर्णी यांनी कार्यकर्ता आणि कुटुंब

हा विषय मांडला. त्यांच्या भाषणाचा  हा सारांश  


कार्यकर्ता आणि कुटुंब या संज्ञांचा विचार / परस्परसंबंध बघण्याआधी त्या संज्ञांचा अर्थ बघू या.

कुटुंब – कुटुंब म्हणजे विवाहसंबंध, रक्तसंबंध, दत्तक विधान या कारणाने एकत्र वास्तव्य          करणा-या व्यक्तींचा समूह होय.

कार्यकर्ता – काम म्हणजे ‘कार्य’ म्हणजेच काम करणारा तो ‘कार्यकर्ता’. कर्मचारी व कार्यकर्ता यातदेखील फरक आहे. कर्मचा-याला तो करत असलेल्या कामाचा मोबदला / पगार मिळतो. परंतु कार्यकर्ता हा स्वयंप्रेरणेने काम करणारा असतो. त्यामुळे त्याला मोबदला / पगार मिळत नाही. परंतु, कर्मचारी हा कार्यकर्ता असू शकतो.

कार्यकर्ता हा कुटुंबातच जन्माला येतो.

कार्यकर्त्याचे काम काय असे विचारले तर ‘लष्कराच्या भाक-या भाजणे’ असे गमतीदार उत्तर देता येईल. त्यामुळे शिवाजी जसा शेजारच्या घरात जन्माला यावा असे वाटते तसेच कार्यकर्ता हा आपल्या घरात नसावा असे वाटते. कारण लोकांचे प्रश्न जाणून घेऊन, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन, त्यांचे निराकरण विनामोबदला दिवसरात्र जे करतात ते कार्यकर्ते. मग तो शेजारच्याच घरात जन्मावा असे वाटणे स्वाभाविक आहे.

      मुळात कार्यकर्ता का असावा, त्याची गरज का आहे?असा विचार करता ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ या पंक्तीचा संदर्भ घ्यावासा वाटतो. कोणतीही संघटना जेव्हा उभारायची असते तेव्हा त्या संघटनेचे ध्येय, उद्दिष्ट साध्य करण्यसाठी, त्या संघटनेची व्याप्ती वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज असते. ज्याप्रमाणे कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या हाताच्या करंगळीवर उचलून धरला परंतु त्याला इतरांनी आपापल्या काठ्यांचा आधार दिला (टेकू दिला) त्याचप्रमाणे संघटनेची व्याप्ती वाढविण्यासाठी, तिच्या ध्येयपूर्तीसाठी संघटक, जरी झटत असला तरी त्याला इतरांच्या सहाय्याची आवश्यकता असते, म्हणजेच कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. किंवा जसं एक लाकडाची काठी कोणीही मोडू शकतो पण जर अनेक काठ्यांची एक मोळी बांधली तर ती तोडणं सहज शक्य होत नाही. त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते एकत्र आले तर संघटना बळकट होण्यास मदत होते.

      आता आपल्याला कळले की कार्यकर्ता का महत्त्वाचा आहे? असा हा कार्यकर्ता कसा असावा याचाही विचार करू या. आपल्याला कार्यकर्त्याच्या वैयक्तिक व कौटुंबिक अशा दोन्ही बाजूंचा विचार करावा लागेल.

कार्यकर्त्याची वैयक्तिक बाजू:

१.      कार्यकर्त्याचा आत्मविश्वास

२.      त्याची परिश्रम करण्याची तयारी

३.      त्याचे संभाषण कौशल्य

४.      त्याची शिस्तप्रियता

५.      वेळेचं महत्त्व

६.      अभ्यासू वृत्ती

याचबरोबर

१.      गोपनीयता पाळण्याची क्षमता

२.      चिकित्सक वृत्ती

३.      त्याला असणारी संघटनेचा पूर्व इतिहास, तत्त्व, ध्येय, उद्दिष्ट याविषयी माहिती

४.      संघटनेबद्दल आपुलकी

५.      कार्यकर्ता जोडणारा आहे का?

६.      पंचदान – वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य आणि पैसा (गरज पडल्यास) संस्थेला/ संघटनेला देण्याची इच्छा आहे का?

७.      बहुविध बुद्धिमत्ता (multiple intelligence) 

वरच्या सगळ्या मुद्द्यांचा संकलित विचार केला तर असे लक्षात येते की, पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘नारायण’ हा आद्य ‘कार्यकर्ता’ असे म्हणणे वावगे ठरू नये. ‘नारायण’ डोळ्यासमोर आणला तर वरील सर्व स्वभाववैशिष्ट्ये आपल्याला त्याच्यात पहावयास मिळतात व ती समजून घेणेही सोपे जाते. नारायणावर जशी अनेक कामं पार पडण्याची जबाबदारी होती व ती पार पडत असताना आपल्याला नारायणातील परिश्रम करण्याची तयारी, योजनाबद्ध नियोजन, वेळेचं महत्त्व, त्याचा इतरांकडून काम करून घेण्यातील हातखंडा, संभाषण कौशल्य, त्याची निर्णयक्षमता या आणि अशा विविध स्वभावगुणांचं दर्शन होतं त्याचप्रमाणे संघटनेच्या कामात कार्यकर्त्याच्या ठायी ही सर्व स्वभाव वैशिष्ट्ये असणे गरजेचे आहे. कार्यकर्ता जर अभ्यासू वृत्तीचा, चिकित्सक असेल तरच लोकांच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती उपाययोजना तो सुचवू शकेल. त्याच्याकडे चांगले  संवाद / संभाषण चातुर्य असेल तर तो लोकांशी तर चांगला संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊ शकतोच पण त्याच्या सहकार्यांशीही सुसंवाद साधून त्यांच्या कामात येणा-या अडचणी, काही अनुभवाचे बॉल त्यांना सांगून परस्परसंबंध दृढ होण्यास मदत होईल.

   जर कार्यकर्त्यांमध्ये परस्परसंबंध जिव्हाळ्याचे असतील तर संघटनेचे कार्य अधिक उत्तमरित्या चालेल यात शंका नाही. संघटनेच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्याचे गुणवैशिष्ट्य बघायचे झाल्यास त्याला संघटनेचा पूर्व इतिहास, संघटनेची तत्त्व, ध्येय, उद्दिष्टे याबद्दल माहिती आहे का? संघटनेच्या कामासाठी त्याची पंचदान देण्याची तयारी आहे का? तो आपल्या संवाद कौशल्याने कार्यकर्ता जोडणारा आहे का? त्याला संघटनेबद्दल आपुलकी वाटते का? तो चिकित्सकवृत्तीचा आहे का? त्याच्याकडे बहुविध बुद्धिमत्ता आहे का व तो त्याचा उपयोग संघटन कार्यात, संघटनेच्या उन्नतीसाठी करू इच्छितो का? यासारख्या गुणांचा विचार करावा लागेल.

   या सर्व गुणांनी संपन्न व्यक्ती कार्यकर्ता असेल तर संघटनेचा विकास, तिची व्याप्ती (वाढण्यासाठी नक्कीच मोलाची गोष्ट आहे) वाढीस लागेल यात शंका नाही.

   परंतु जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसेच गुणी, कुशल कार्यकर्ता बनण्यासाठी तो कार्यकर्ता बनण्याआधी सामान्य व्यक्ती असताना त्याच्या लहानपणापासून त्याच्या कुटुंबातून त्याच्यावर कोणते, कसे संस्कार झाले आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. कारण कुटुंबातून शिस्तप्रियता, वेळेचं महत्त्व, परिश्रमाची सवय, चौकसपणा, मोठ्यांविषयी आदरभाव, भेदभाव न पाळणे, संभाषण चातुर्य, माणसं जोडण्याची कला अशासारखे संस्कार लहानपणापासून त्याच्यावर झाले असतील तर त्याचे हे संस्कार, त्याच सवयी मोठे झाल्यावर त्याच्या कार्यकर्ता बनण्याच्या प्रवासात त्याला खूप उपयोगी पडतात व त्याला उत्तम, कुशल कार्यकर्ता बनण्यास महत्त्वपूर्ण भमिका बजावतात.

   आत्ता आपण बघितले कार्यकर्ता बनण्यापूर्वी कुटुंब कसे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे व्यक्ती कार्यकर्ता बनल्यावर कुटुंब कसे महत्त्वाचे आहे ते आपण बघू या.

   आता हे कुटुंब म्हणजे ‘संघटना’, ‘संस्था’ होय. कार्यकर्ता ज्या संघटनेचा असेल ती ‘संघटना’ म्हणजे त्याचे ‘कुटुंब’ च होय. कुटुंबात जसे अनेक लोक एकत्र राहतात, त्यांच्यात लहान-मोठे असे स्तर असतात (उदा. कुटुंबप्रमुख, कर्तापुरुष – आजी-आजोबा, आई-वडील, मुले) त्याचप्रमाणे संघटनेच्या कुटुंबातदेखील संघटक, पदाधिकारी, कार्यकर्ता असे विविध स्तर असतात. अनेकजणांचे मिळून एक कुटुंब बनते त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते मिळून एक संघटना नावाचे ‘कुटुंब’ बनते.

   कार्यकर्ता जसा त्याच्या घरादाराला वेळ देतो त्याचप्रमाणे त्याने संघटनेला, संघटनेच्या कार्याला वेळ देणे गरजेचे असते. ज्याप्रमाणे तो स्वत:च्या घरी भविष्यासाठी आर्थिक नियोजन करतो त्याचप्रमाणे त्याने संघटनेच्या आर्थिक व्यवहारात लक्ष देणे आवश्यक आहे. कारण आर्थिक स्थिरता आली की आपोआपच संघटनेच्या कार्याला बळ मिळेल. कार्यकर्त्या कुटुंबातील अनेकजणांचे भिन्न स्वभाव, भिन्न भावना जशा जपतो त्याचप्रमाणे संघटनेतील अनेक कार्यकर्ते, त्यांचे भिन्न स्वभाव, भिन्न मते यांचा समन्वय साधून त्यातून योग्य मार्गदर्शन करून संघटनेचे कार्य पुढे चालू ठेवणे गरजेचे आहे. तो कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता सर्वांच्या मताला, वरिष्ठांना मान देणारा असावा. त्याचे काम पारदर्शी असावे. कार्यकर्ता काम करत असताना त्याला अनेकदा त्याचे सहकारी, वरिष्ठ, पदाधिकारी यांच्या कुटुंबात कामानिमित्त जाण्याचीही वेळ येते. अशा वेळेस त्या कुटुंबाच्या भावना जाणणारा, त्यांच्याशी सुसंवाद साधणारा, योग्यरित्या प्रतिसाद देणारा कार्यकर्ता असेल तर अर्थातच त्याचे त्या कुटुंबाशीही स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतात. त्याची चांगली प्रतिमा तयार होते. यातूनच त्याचा व्यक्ती म्हणून विकास होतो व कार्यकर्ता म्हणूनही.

   आपण आत्ता कार्यकर्ता आणि कुटुंब या सगळ्यावर विचारमंथन केले पण त्यात अजून एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ‘स्त्री’ कार्यकर्ता. स्त्री ही जन्मजातच कार्यकर्ता असते. ती दैनंदिन व्यवहारातदेखील असंख्य पूरक कामे करीत असते. ती एकाचवेळी अनेक भूमिका, त्यासाठीची कर्तव्ये पार पडत असते. त्यासाठीचे निर्णय घेत असते. स्त्री कार्यकर्त्यांच्या बाबतीत स्थळ – काळाच्या काही मर्यादा असतात. तरीही त्या पाळून स्त्रिया उत्तम कार्य करू शकतात. धार्मिक, सामाजिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात कार्यकर्त्यांची गरज पडते. ज्याप्रमाणे कुटुंबाचा गाडा हाकताना स्त्री – पुरुष दोघांचाही सहभाग असतो त्याचप्रमाणे संघटनेचा गाडा हाकताना, त्याची उद्दिष्टे साध्य करीत असताना स्थळ – काळाची बंधने, मर्यादा पाळून स्त्री कार्यकर्ताही सहभागी होऊ शकते. 

स्त्री कार्यकर्त्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :

·         कुटुंबात ज्याप्रमाणे मनमोकळा संवाद केला जातो तसाच मनमोकळा संवाद करावा.

·         काम करताना तर कोणी काही बोलले तर छोट्या छोट्या गोष्टी मनावर न घेता त्याचे चिंतन करावे.

·         एखाद्याला दुरुत्तर न करता त्यावर मात करून कृती करावी.

अशा प्रकारे कार्यकर्ता जसे वैयक्तिक आयुष्यात स्वत:च्या कुटुंबात जसजशा जबाबदा-या पार पाडतो जसे, निर्णय घेतो, सर्वांमध्ये समन्वय राखतो तसेच ‘संघटने’ च्या ‘कुटुंबात’ देखील या गुणांचा अवलंब केला तर कार्यकर्त्या बरोबरच त्याचे ‘कुटुंब’ देखील मोठे होईल यात काही शंका नाही. कार्यकर्तेएकमेकांशी घट्ट जुळले की संघटनेचे ‘कुटुंब’ निर्माण होते. कुटुंब – कुटुंब जुळली की कार्यकर्ता जुळायला वेळ लागत नाही व यातूनच संघटनेचा विस्तार होण्यास गती मिळते. ‘माझं’ असं काही न राहता ‘आपलं’ होतं व ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा परम विकासाचा कळस गाठण्याचं स्वप्न देखील प्रत्यक्ष साकार होऊ शकेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 

Thursday, 7 April 2022

 


ग्राहकराजा आयोजित online मार्गदर्शन

 अभ्यासवर्गात  संघटनेचे महत्त्व

हा विषय धनंजयराव गायकवाड यांनी मांडला होता 


      ‘संघटना’.... आपण बघतो की, आपल्या आजूबाजूला विविध क्षेत्रातील, विविध ध्येय, उद्दिष्टे
असणा-या अनेक संस्था, संघटना काम करत असतात. 

      पूर्वी अगदी कौटिल्य पासून विचार केला तर पुढे बिंदुमाधव जोशी यांनी ग्राहक पंचायत ही संघटना उभारून ‘शोषणमुक्त समाज’ हे ध्येय ठेऊन मोठी चळवळ सुरु केली. त्यांनी यामध्ये असंख्य कार्यकर्ते जोडले व संघटना मजबूत बनवली. याचा परिणाम असं झाला की, सरकार दरबारी ३०-३२ कलमी कायदा मंजूर करणे शासकीय यंत्रणेला भाग पडले. कारण इथे संघटनेचा सांघिक रेटा होता.

      एखाद्या व्यक्तीने एखादी वस्तू खरेदी केली पण ती चांगली निघाली नाही तर त्या व्यक्तीला त्याविरुद्ध दाद मागण्याचा अधिकार आहे. परंतु बरेचदा असे दिसून येते की, ती व्यक्ती खूप प्रयत्न करून देखील अपयशी ठरते. परंतु हीच व्यक्ती जत ग्राहक पंचायती मध्ये आपली तक्रार घेऊन आली तर टा निश्चितच त्याचा फायदा होऊ शकतो. कारण एक तर तिला तिथे योग्य मार्गदर्शन मिळते, आणि एका व्यक्तीपेक्षा संघटनेचा आवाज यात खूप फरक पडतो. संघटनेकडून जर दाद मागितली जात असेल तर नक्कीच विचारपूर्वक हालचाली केल्या जातात. म्हणजेच थोडक्यात संघटन असेल तर  त्यात सरकारी यंत्रणेला झुकविण्याचे सामर्थ्य असते.

      “अद्वितीय” म्हणजे एकासारखा दुसरा नाही. याचा फायदा संघटनांनी करून घ्यायला हवं. या भूतलावर प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे. प्रत्येकाकडे काही गुण-दोष आहेत, प्रत्येकाकडे काही न काही स्वभाववैशिष्ट्ये आहेत. याचा फायदा घेऊन संघटकाने कोणती व्यक्ती कुशल कार्यकर्ता होऊ शकते हे हेरले पाहिजे किंवा प्रत्येक व्यक्ती संघटनेचा कार्यकर्ता कशी बनू शकेल?, त्यासाठी त्याला कोणत्या प्रशिक्षणाची आवश्यकता आहे? याचे बारकाईने निरीक्षण केल्यास संघटनेला मोठया प्रमाणात ‘कुशल कार्यकर्ता’ मिळू शकेल.

      आपण या भूतलावर जन्म घेतला आहे तर त्या जन्माचे काहीतरी चांगले कार्य करून सार्थक केले पाहिजे. संघटनेचे सबलीकरण कसे होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. व्यापक संघटनासाठी मुळात ग्राहक डोळा विकसित करणे गरजेचे आहे. यासाठी संघटनेचे कार्य, तिची उद्दिष्टे ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहोचतील यासाठी कृतीशील कार्यक्रम राबवले पाहिजेत. जेणेकरुन सामान्य नागरिकांना संघटनेची माहिती होईल व ते त्यांच्या तक्रार निवारणासाठी किंवा इतर कही मदत घेण्यासाठी ते संघटनेकडे येतील.

      यासाठी सगळ्यात आधी ग्राहकांचे ‘संघटन’ होणे आवश्यक आहे. आपल्याकडे ग्राहकांचे संघटन का नाही याचे एक कारण प्रकर्षाने जाणवते की,  आज प्रत्येकजण ‘मला काय त्याचे’ किंवा ‘मला काय करायचंय’ हाच दृष्टीकोन मनाशी बाळगून जगतो आहे. आपल्या ओळखीत, शेजारीपाजारी कोणाची फसवणूक झाली असेल तर ते फक्त ऐकून घेऊन ‘जाऊ दे मला काही त्याचा त्रास नाही ना मग मि कशाला त्यात लक्ष घालू, मला काय करायचंय’ असा विचार करून बाजूला होणारे असख्य जण आपल्या आजूबाजूला पदोपदी दिसतात पण अशी वेळ स्वत:वर आली की हवालदिल होतात.

      परंतु, यातून फसवणूक झालेला व फसवणूक न झालेला कोणीच हा विचार करत नाही की माझी फसवणूक झाली तशी बाकीच्यांची होऊ नये म्हणून न घाबरता, मनात संकोच न बाळगता, खुलेपणाने फसवणूक होऊ नये व झाली तर कोणाची, काय मदत घ्यायची ही माहिती इतरांना दिली पाहिजे. उलटपक्षी ज्याची फसवणूक झालेली नाही त्यानेदेखील समोरच्याकडून (ज्याची फसवणूक झाली आहे त्याच्याकडून) डोळसपणे माहिती घेतली पाहिजे, त्याला त्याच्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी मदतीचा हात पुढे केला पहिजे.

      यासाठीच ग्राहकांचं प्रबोधन करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, कोणत्या तक्रारीसाठी कोणाकडे मदत मागायची याचे ज्ञान करून दिले पाहिजे. कारण तेल, तूप, डाळी एवढ्यापुरतच हे मर्यादीत नसून ऑनलाईन फसवणूक देखील (सायबर क्राईम) मोठया प्रमाणात वाढत आहे. कित्येकदा बँकेमधून पैसे चोरीला गेल्याच्या घटना आपण ऐकतो. मग अशा परिस्थितीत हातपाय गाळून न बसता काय पाऊले उचलली गेली पाहिजेत यासाठी उलट ग्राहक जागरूक पाहिजे. त्याचे प्रबोधन / प्रशिक्षण झालेले असले पाहिजे. तर तो योग्य मार्गाने, योग्य ठिकाणी जाऊन दाद मागू शकेल.

      या सगळ्यासाठी मुळात ‘संघटन’ मजबूत असणे गरजेचे आहे. त्यात ‘संघटनांचे संघटन’ व ‘ग्राहकांचे संघटन’ या दोन्हीचा विचार करावा लागेल.

      आपण वर बघितले की, एकट्या-दुकट्याने ग्राहकाची फसगत झाली तर काय काय करावे पण याचप्रकारे एकाच वेळी अनेकांची (सामुहिक) फसगत झाली सेल तर अशा सर्व ग्राहकांनी एकत्र येऊन, संघटित होऊन अन्यायाविरुद्ध दाद मागितली तर अशा संघटित ग्राहकांचा आवाज, त्यांचा रेटा याचा सरकारी यंत्रणांवर निश्चितच मोठया प्रमाणावर दबाव निर्माण होतो व त्या ग्राहकांना न्याय मिळण्यामध्ये याचा खूप फायदा होऊ शकतो. यासाठी ग्राहकांचे ‘संघटन’ होणे महत्त्वाचे आहे.

      तसेच संघटनांमधील संघटनही खूपच महत्त्वाचे असते. एखाद्या संघटनेत कार्यकर्त्यांमध्येच विसंवाद असेल, कार्यकर्ताच जर निरुत्साही असेल, त्याचे संभाषण कौशल्य, चिकित्सक, अभ्यासू वृत्ती नसेल, काम करण्याची तळमळ नसेल तर तो इतर सहकार्यांनादेखील जोडला जाणार नाही. याचा दुष्परिणाम मात्र संघटनेचवर होईल. संघटनेचे कार्य सुरळीत चालू राहणार नाही, तिचे उद्दिष्ट, ध्येय साध्य होणार नाही. ‘संघटने’ ची प्रतिमा मलीन होईल. हे सर्व रोखायचे असेल तर संघटक, पदाधिकारी ते संघटनेचा लहानात लहान कार्यकर्ता यांच्यामध्ये समन्वय असणे, एकमेकांबद्दल मनात आकस नसणे, परस्परांच्या अडचणी, मर्यादा समजून घेऊन योग्य्योग्य ते मार्गदर्शन करणे, सल्ला देणे, मदत करणे यातून परस्परसंबंध जिव्हाळ्याचे निर्माण होतील. प्रत्येक कार्यकर्ता हा परिपूर्ण होण्यासाठी संघटकांनी, वरिष्ठांनी कार्यकर्त्यांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याला योग्य मार्गदर्शन केले तर तो कार्यकर्ता उत्साहाने नवनवीन जबाबदा-या पेलू शकेल. त्याचप्रमाणे उलटपक्षी प्रत्येक कार्यकर्त्याने एकमेकांना सहाय्य केले, आपल्यातील त्रुटी, दोष निवारणासाठी प्रयत्न केले तर नक्कीच वरिष्ठांकडून त्याला पाठीवर शाबासकीची थाप मिळू शकेल. त्यांचा विश्वास तो संपादन करून घेऊ शकेल व हे संघटनेच्यादृष्टीने खूप मोलाचे आहे. कारण जर असे विविध क्षेत्रातील परिपूर्ण कार्यकर्ते संघटनेला मिळाले तर संघटनेचा पाया मजबूत होईल व संघटनेला कळस गाठणे (उद्दिष्ट/ध्येय साध्य करणे) सहज शक्य होईल.

      यासाठीच कोणत्याही क्षेत्रात ‘संघटन’ हे अतिशय महत्त्वाचे आहे. जिथे  संघटन असेल तिथे अतिशय उत्तम कार्य चालू राहील यात काही शंका नाही.

 

 

Wednesday, 6 April 2022


 ऑनलाइन
अभ्यासवर्ग

विषय : माहिती अधिकार कायदा 

दि 23 व २४  एप्रिल 2022 रोजी

वेळ शनिवारी सायं ७ ते ८ 

रविवारी सायं ६.३० ये  ८ वा 

ऑनलाइन अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

1 प्राधान्याने नावनोंद करणाऱ्या 75 जणांना प्रवेश

2 गुगल फॉर्म भरूनच प्रवेश घेता येईल 

3 प्रवेश शुल्क २०० रु ऑनलाईन पद्धतीने 

अभ्यासवर्गास 100% उपस्थित राहिल्यास १०० रु फी परत मिळणार

Google pe/Phone pe 

8421034968 या नंबरवर करावे

4 ज्या नावाने नावनोंद केली आहे त्याच नावाने जॉईन व्हावे लागेल 

5. सहभागी कार्यकर्त्यांना संपुर्ण कार्यक्रमाची टिपणी व फॉर्म चा नमुना मिळेल  

( व्हाट्सएप/मेल वर)

6 सहभागाचे प्रमाणपत्र मिळेल 

यासोबत जोडलेला फॉर्म भरणे आवश्यक आहे 

https://docs.google.com/forms/d/1xsYOfcKelGiDTZOgybqiqEGkDD3Bxyv6BAFO4BEjMRE/edit

-आयोजक-

ग्राहकराजा परिवार


 

मी ग्राहकराजा हि एक चळवळ आहे. प्रबोधन, प्रशिक्षण आणि सुसंवाद हे ब्रीद घेऊन याचे कार्य चालते. ग्राहकराजा प्रकाशन हि एक प्रकाशन संस्था आहे. कोरोनाच्या काळात सुरु झालेली एक चळवळ. online मार्गदर्शन या माध्यमातून गेली ८५ आठवडे वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आता प्रशिक्षण कार्यक्रम चालू आहेत. कार्यकर्त्याने घरात बसून ज्ञान घ्यावे. यासाठी online प्रशिक्षण उपक्रम सुरु आहे. आता थोड्याच दिवसात माहिती अधिकार कायदा या विषयावर प्रशिक्षण घेणार आहोत.

या संपूर्ण उपक्रमात आपल्या सूचनांचा स्वीकार करू.

संपर्क : दिलीप ज्ञानेश्वर फडके 9421034968

मेल आयडी : grahakrajaa@gmail.com

dphadke06@gmail.com 


कार्यकर्ता या विषयावर अभ्यासवर्ग झाला 

त्यात उस्मानाबाद येथून मा शेषाद्री डांगे यांनी 

कार्यकर्त्याचे मानसशास्त्र 

या विषयावर मार्गदर्शन केले त्याचे हे शब्दांकन 

(श्री. शेषाद्री डांगे)

      ‘मानसशास्त्र’ म्हटले की दडपण येते. मानसशास्त्र या विषयात प्रामुख्याने मानवी मनाचा अभ्यास केला जातो. मानवी मन हे जरी अदृश्य असले तरी त्यामुळे होणारे परिणाम – दुष्परिणाम हे दृश्य असतात.

      डांगे सरांनी आपल्याला अतिश सुंदर पद्धतीने, सोप्या भाषेत ‘कार्यकर्त्याचे मानसशास्त्र’ हा अवघड विषय समजावला. ‘शास्त्र’ म्हटले की फार दडपण येते. त्यामुळे ‘कार्यकर्त्याचे मानस’ से समजून घेतले पाहिजे त्यासाठी काय काय करावे याबद्दलचे मार्गदर्शन सरांनी त्यांच्या ओघवत्या वाणीने केले.

एखादी व्यक्ती नोकरी करते म्हणजे तो कार्यकर्ता नाही का? तर प्रत्यक कर्मचारी, कामगार हा त्या त्या संघटनेचा कार्यकर्ता असतो. उदा. बँक, शिक्षणक्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र. हे सर्व त्या त्या क्षेत्रातील कार्यकर्तेच आहेत. फरक एवढाच असतो की सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती ही स्वेच्छेने, विनामोबदला काम करते. अशा कार्यकर्त्यांची मानसिकता भिन्न असते. त्यांना तक्रार करायला जागाच नसते. कारण त्यांनी स्वत:हून ते काम पत्करलेले असते.

      संघटनेच्या बैठकीत जाऊन चर्चा करून बैठक संपल्यावर आपापल्या मार्गी परत फिरणारे कार्यकर्ते असतील तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. एखादी संघटना यशस्वीपणे कार्यान्वित करायची असेल, तिची व्याप्ती वाढवायची असेल तर प्रथम कार्यकर्त्याचं मन ओळखणे, त्याच्या अपेक्षा काय आहेत हे ओळखणे महत्त्वाचे असते.

      जन्मत: कोणी कार्यकर्ता नसतो. काम करता करताच कार्यकर्ता घडत असतो. एखाद्या संघटनेचा विस्तार करायचा असेल तर कार्यकर्त्याच्या क्षमतेवरच तो होऊ शकतो. कार्यकर्त्याची समज, क्षमता, त्याचा दृष्टीकोन यावर त्याचा वैयक्तिक विकास अवलंबून असतो व त्याच्यावर संघटनेचा विकास अवलंबून असतो. त्यामुळे पुढील गोष्टी महत्त्वाच्या वाटतात.

      कोणताही कार्यकर्ता हा सगळ्यात आधी माणूस आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी माणसाप्रमाणेच व्यवहार केला पाहिजे. कारण मुळात माणूसच कळला नाही तर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे सगळे कार्यकर्ते माणूस आहेत हे सर्व संघटक, पदाधिका-यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवले पाहिजे.

      आत्ता मुद्दा येतो तो कार्यकर्त्याला मन असते का? जर कार्यकर्ता हा जिवंत व्यक्ती आहे, माणूस आहे तर त्याला मन निश्चितच आहे. दुर्दैवाने आज सर्वच क्षेत्रात ‘व्यावसायिकरण’ झाले आहे. त्यामुळे पैसे देऊन काम करून घ्या अशी वृत्ती दिसते. परंतु, कार्यकर्त्याला एखादे काम सोपवले तर आपोआपच त्याच्याशी संवाद साधला जातो, त्याला जर काही गोष्टींची भिती वाटत असेल, अडचण येत असेल तर त्याला धीर देऊन, त्याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून काम करून घेऊ शकतो. त्यामुळे परस्परसंबंध सुधारतील.

      कार्यकर्ता व पदाधिकारी (one to one) यांचे एकमेकांशी परस्परसंबंध प्र्स्थाप्पित झाले तर संघटक, पदाधिकारी यांच्यात जिव्हाळा निर्माण होईलच परंतु त्यांना त्या कार्यकर्त्याच्या सूप्त गुणांची पारख करणे, त्याच्या क्षमता काय आहेत हे लक्षात घेणे, त्याची विचारशैली कशी आहे?, तो मल्टी टास्किंग करू शकतो का? त्याचे weak points काय आहेत?, त्याला कोणत्या गोष्टीत मार्गदर्शनाची आवश्यकता आहे? या आणि अशा अनेक गोष्टी वरिष्ठांच्या लक्षात येतील. त्याचप्रमाणे वरिष्ठांकडून कार्यकर्त्याच्या एखाद्या कामाचे कौतुक झाले, त्याची चूक पदरात घालून वरिष्ठांनी त्याला आपुलकीने समजावले किंवा त्याला आलेल्या अडचणीत मार्ग दाखवला तर त्या कार्यकर्त्याचा वरिष्ठांविषयीचा आदर वाढतोच पण नवनवीन आव्हानं पेलण्याची, नवनवीन कामं करण्याची त्याला ऊर्मीही येते. कारण न सांगता मनातलं कळलंकी विश्वास वाढतो, मनासारखं झालं की आनंद वाटतो.

      ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी कार्यकर्त्यांना एकमेकांचा सहवास लाभणे, त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण होणे, एकमेकांच्या तक्रारी/अडचणी जाणून त्या निवारण्यासाठी एकत्र प्रयत्न करणे हे होणे आवश्यक आहे. असे झाले तरच ‘जिवंत संघटना’ तयार होईल. कार्यकर्ता एकमेकांत जेवढा मिसळेल तेवढे संघटन जिवंत होते. मग ते संघटन कोणतेही असो

कार्यकर्त्याच्या अपेक्षा :

·         माणसासारखं वागवावं

·         कामात फेर बदल करावा

·         भेदभाव नको

संघटनेतील इतर सहकारी कार्यकर्ते, वरिष्ठ यांच्याकडून माणुसकीची वागणूक मिळणे कार्यकर्त्याला अपेक्षित असते. जर कोणी सतत अपमान करत असेल, टोचून बोलत असेल तर हे कोणालाच आवडणार नाही. चुका या माणसाकडूनच होतात हे समजून घेऊन अतिशय प्रेमाने त्या कार्यकर्त्याला सांगितले तर त्याला त्याची चूक तर लक्षात येईलच पण तो त्या शक-याशी / वरिष्ठांशी जोडला जाईल.

त्याचप्रमाणे त्याला सतत एकाच प्रकारचं काम दिलं तर नंतर त्याला त्या कामाचा कंताला येईल व एक दिवस तो संघटना सोडून निघून जाईल. कार्यकर्ता निघून जाणं हा संघटनेचा तोटा आहे. कारण ‘येईल त्याला घेतलं पाहिजे व पाहिजे तसं घडवलं पाहिजे’ हे संघटनेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वरिष्ठांनीच त्याची क्षमता ओळखून, त्याच्यातील सूप्त गुण ओळखून त्याला वेगवेगळ्या प्रकारची कामं देऊन ती त्याच्याकडून पार पाडून घेतली पाहिजेत. यातूनच त्या कार्यकर्त्याला कामातील बदलामुळे कामाचा कंटाळा येणार नाही व त्याला स्वत:ला त्याच्यातील सूप्त गुणांची ओळख होऊ शकेल. तसेच वरिष्ठांनाही त्यांच्या निवडीबद्दल (कार्यकर्ता), त्याच्या कामाबद्दल खात्री वाटेल.

संघटनेत अनेक कार्यकर्ते असतात व संघटनेची अनेक कामे देखील असतात. ती कामे वाटून देताना वर्ण-जाती भेद, लिंगभेद, आर्थिक स्तर असे कोणतेही भेदभाव डावलून जर कार्य केले, सर्वांना सामावून घेऊन कामांचे वाटप केले तर ते कार्य उत्तमरीत्या पार पडू शकते व त्यामुळे कार्यकर्त्यांचे परस्परसंबंध जिव्हाळ्याचे होऊन त्याचा फायदा संघटनेला होऊ शकतो.

या सगळ्याबरोबरच संघटनेची काय कर्तव्ये आहेत ती आपण बघू या.

संघटनेची कर्तव्ये :

·         संघटनेचा पूर्व-इतिहास, कार्य, संघटनेची ध्येय, उद्दिष्टे याबद्दलची स्पष्टता

·         कार्यकर्त्यांचे दायित्त्व, त्यांची कर्तव्ये याची स्पष्टता

·         कार्यकर्त्यामधील दोष, त्रुटी निवारण

·         कार्यकर्त्यामधील सूप्तगुणांना प्रोत्साहन

·         सूक्ष्म निरीक्षण

·         सर्वांना सर्व कामे देऊन परिपूर्ण कार्यकर्ता घडविण्याकडे लक्ष

संघटनेतील वरिष्ठ, पदाधिका-यांनी एखादा नवखा कार्यकर्ता असेल तर त्याला संघटनेचा पूर्व-इतिहास, संघटनेचे कार्य, तिची ध्येये, उद्दिष्टे या सगळ्या गोष्टी माहीत आहेत का? व नसेल तर ती देणे अपेक्षित आहे.

त्याचप्रमाणे कार्यकर्ता म्हणून संघटनेप्रति त्याचे काय दायित्त्व आहे? काय कर्तव्य आहे याचीही जाणीव वरिष्ठांनी त्याला करून देणे गरजेचे आहे.

कार्यकर्त्याच्या कामाचे, स्वभावाचे सुक्ष निरीक्षण वरिष्ठांनी करून त्याच्यावर वेगवेगळ्या जबाबद-या टाकून त्याच्यातील सूप्तगुणांना वाव दिला पाहिजे. एखादं कार्यकर्ता विविध गोष्टी विविध प्रकारे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून करत असेल तर हा गुण लक्षात घेऊन त्याच्या या गुणवैशिट्याचा प्रचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे परस्परसंबंध सुधारतीलच पण त्या कार्यकर्त्याचा हुरूप वाढेल, उत्साह वाढेल.

पदाधिका-यांनी आईच्या ममतेने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, त्याचे मन ओळखून, त्याला सन्मान देणे महत्त्वाचे आहे. आई ज्याप्रमाणे सर्व मुलांवर सारखीच माया करते पण त्यांच्यातील गुण-दोष ओळखून, त्यांची गरज ओळखून प्रत्येकाशी त्या त्या प्रमाणे व्यवहार करते त्याचप्रमाणे वरिष्ठांना कार्यकर्त्याची आई होऊन त्यांना आईच्या ममतेने त्यांच्यातील गुण-दोषाची जाणीव करून दिली पाहिजे, त्याची गरज ओळखून योग्य तिथे मदतीचं हात पुढे केला पाहिजे, योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.

कार्यकर्त्याला आपला आदर्श कोण असला पाहिजे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा आदर्श हा एकच असू शकत नाही पण मग त्या आदर्शाप्रमाणे होण्यासाठी मला काय करावे लागेल? माझ्यात काय सुधारणा करायला हव्यात? याचे अंतर्मुख होऊन कार्यकर्त्याने चिंतन करायला हवे. कारण मी स्वत:मध्ये बदल, सुधारणा केली तर मी इतरांना मार्गदर्शन करू शकतो अशी भावना मनांत बाळगली तर कार्यकर्ता हा ‘स्वत:’ विकसित होतो.

संघटनेत अनेक लोक विविध प्रकारच्या तक्रारी घेऊन त्याचे निराकरण व्हावे या आशेने येतात. यासाठी मुळात संघटनेमध्ये विविध क्षेत्रातील कार्यकर्ते असणे अत्यावश्यक आहे. (उदा. वीज, बांधकाम, रस्तेबांधणी, सार्वजनिक स्वच्छता) विविध क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ता संघटनेत हवा. त्याला त्याच्या क्षेत्रातील बारकावे, अडचणी माहीत असाव्यात. त्यामुळे एखाद्या समस्येतून कसा मार्ग काढता येईल याचे योग्य मार्गदर्शन तो करू शकेल. यामुळे लोकांचा संघटनेवरील विश्वास वृद्धिंगत होईल व संघटनेचे कार्य वाढीस लागून तिची चांगली प्रतिमा लोकांमध्ये तयार होईल व आपोआपच संघटना ‘मोठी’ होईल.

सगळ्यात शेवटी असे म्हणावे लागेल की, संघटनेतील पदाधिकारी, वरिष्ठांनी कार्यकर्त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यापक, सर्वस्पर्शी, सर्वव्यापी ठेवला पाहिजे. त्यासाठी मनात सद्भावना कायम ठेवली पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे आत्मचिंतन करून ‘मी’ (स्वत:) पासून बदलांना सुरुवात केली पाहिजे अर्ण स्वत:च्या मनाला जाणून घेतल्याशिवाय इतरांच्या मनाचा ठाव घेता येत नाही. स्वत: वदना सोसल्याशिवाय संवेदना जागी होत नाही. त्यामुळे स्वत:च्या मनाला नियंत्रित करून, त्यावर प्रयत्नपूर्वक चांगले संस्कार करून त्याला घडवावं लागतं, त्याची निर्मलता जपावी लागते. कारण असे संवेदनाशील मनच दुस-याचे मन जाणून घेऊ शकते. म्हणजेच ‘कार्यकर्त्याचे मानस’ जाणून घेऊन त्या कार्यकर्त्याला संघटनेशी कसे जोडून ठेवता येईल, तो संघटनेच्या सर्व आयामांना कसा स्पर्श करू शकेल, त्यासाठी काय करायला हवे हे समजून कार्य करणे व एक परिपूर्ण कार्यकर्ता बनण्यास व बनवण्यास निश्चितच याचा मोठा हातभार लागू शकतो यात शंका नाही.

संघटक हा प्रेरक, उर्जा देणारा, आधार देणारा, अनुभवांची श्रीमंती असणारा असला पाहिजे. ‘मन जुळे तो क्षण भाग्याचा’ हा मूलमंत्र लक्षात ठेऊन सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कार्यरत राहिल्यास वेगळे ‘कार्यकर्ता मानसशास्त्र’ शिकण्याची / समजून घेण्याची काहीच गरज पडणार नाही असा विश्वास वाटतो.

असाही एक व्हाटसप्प ग्रुप

  ग्राहक चळवळीला मार्गदर्शक " खटाव तालुका ग्राहक संरक्षण समिती " व्हाट्सऍप ग्रुप.                                              ...