Wednesday, 6 April 2022


 

मी ग्राहकराजा हि एक चळवळ आहे. प्रबोधन, प्रशिक्षण आणि सुसंवाद हे ब्रीद घेऊन याचे कार्य चालते. ग्राहकराजा प्रकाशन हि एक प्रकाशन संस्था आहे. कोरोनाच्या काळात सुरु झालेली एक चळवळ. online मार्गदर्शन या माध्यमातून गेली ८५ आठवडे वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आता प्रशिक्षण कार्यक्रम चालू आहेत. कार्यकर्त्याने घरात बसून ज्ञान घ्यावे. यासाठी online प्रशिक्षण उपक्रम सुरु आहे. आता थोड्याच दिवसात माहिती अधिकार कायदा या विषयावर प्रशिक्षण घेणार आहोत.

या संपूर्ण उपक्रमात आपल्या सूचनांचा स्वीकार करू.

संपर्क : दिलीप ज्ञानेश्वर फडके 9421034968

मेल आयडी : grahakrajaa@gmail.com

dphadke06@gmail.com 


कार्यकर्ता या विषयावर अभ्यासवर्ग झाला 

त्यात उस्मानाबाद येथून मा शेषाद्री डांगे यांनी 

कार्यकर्त्याचे मानसशास्त्र 

या विषयावर मार्गदर्शन केले त्याचे हे शब्दांकन 

(श्री. शेषाद्री डांगे)

      ‘मानसशास्त्र’ म्हटले की दडपण येते. मानसशास्त्र या विषयात प्रामुख्याने मानवी मनाचा अभ्यास केला जातो. मानवी मन हे जरी अदृश्य असले तरी त्यामुळे होणारे परिणाम – दुष्परिणाम हे दृश्य असतात.

      डांगे सरांनी आपल्याला अतिश सुंदर पद्धतीने, सोप्या भाषेत ‘कार्यकर्त्याचे मानसशास्त्र’ हा अवघड विषय समजावला. ‘शास्त्र’ म्हटले की फार दडपण येते. त्यामुळे ‘कार्यकर्त्याचे मानस’ से समजून घेतले पाहिजे त्यासाठी काय काय करावे याबद्दलचे मार्गदर्शन सरांनी त्यांच्या ओघवत्या वाणीने केले.

एखादी व्यक्ती नोकरी करते म्हणजे तो कार्यकर्ता नाही का? तर प्रत्यक कर्मचारी, कामगार हा त्या त्या संघटनेचा कार्यकर्ता असतो. उदा. बँक, शिक्षणक्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र. हे सर्व त्या त्या क्षेत्रातील कार्यकर्तेच आहेत. फरक एवढाच असतो की सामाजिक क्षेत्रात काम करणारी व्यक्ती ही स्वेच्छेने, विनामोबदला काम करते. अशा कार्यकर्त्यांची मानसिकता भिन्न असते. त्यांना तक्रार करायला जागाच नसते. कारण त्यांनी स्वत:हून ते काम पत्करलेले असते.

      संघटनेच्या बैठकीत जाऊन चर्चा करून बैठक संपल्यावर आपापल्या मार्गी परत फिरणारे कार्यकर्ते असतील तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. एखादी संघटना यशस्वीपणे कार्यान्वित करायची असेल, तिची व्याप्ती वाढवायची असेल तर प्रथम कार्यकर्त्याचं मन ओळखणे, त्याच्या अपेक्षा काय आहेत हे ओळखणे महत्त्वाचे असते.

      जन्मत: कोणी कार्यकर्ता नसतो. काम करता करताच कार्यकर्ता घडत असतो. एखाद्या संघटनेचा विस्तार करायचा असेल तर कार्यकर्त्याच्या क्षमतेवरच तो होऊ शकतो. कार्यकर्त्याची समज, क्षमता, त्याचा दृष्टीकोन यावर त्याचा वैयक्तिक विकास अवलंबून असतो व त्याच्यावर संघटनेचा विकास अवलंबून असतो. त्यामुळे पुढील गोष्टी महत्त्वाच्या वाटतात.

      कोणताही कार्यकर्ता हा सगळ्यात आधी माणूस आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी माणसाप्रमाणेच व्यवहार केला पाहिजे. कारण मुळात माणूसच कळला नाही तर आपण काहीच करू शकत नाही. त्यामुळे सगळे कार्यकर्ते माणूस आहेत हे सर्व संघटक, पदाधिका-यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवले पाहिजे.

      आत्ता मुद्दा येतो तो कार्यकर्त्याला मन असते का? जर कार्यकर्ता हा जिवंत व्यक्ती आहे, माणूस आहे तर त्याला मन निश्चितच आहे. दुर्दैवाने आज सर्वच क्षेत्रात ‘व्यावसायिकरण’ झाले आहे. त्यामुळे पैसे देऊन काम करून घ्या अशी वृत्ती दिसते. परंतु, कार्यकर्त्याला एखादे काम सोपवले तर आपोआपच त्याच्याशी संवाद साधला जातो, त्याला जर काही गोष्टींची भिती वाटत असेल, अडचण येत असेल तर त्याला धीर देऊन, त्याचा विश्वास संपादन करून त्याच्याकडून काम करून घेऊ शकतो. त्यामुळे परस्परसंबंध सुधारतील.

      कार्यकर्ता व पदाधिकारी (one to one) यांचे एकमेकांशी परस्परसंबंध प्र्स्थाप्पित झाले तर संघटक, पदाधिकारी यांच्यात जिव्हाळा निर्माण होईलच परंतु त्यांना त्या कार्यकर्त्याच्या सूप्त गुणांची पारख करणे, त्याच्या क्षमता काय आहेत हे लक्षात घेणे, त्याची विचारशैली कशी आहे?, तो मल्टी टास्किंग करू शकतो का? त्याचे weak points काय आहेत?, त्याला कोणत्या गोष्टीत मार्गदर्शनाची आवश्यकता आहे? या आणि अशा अनेक गोष्टी वरिष्ठांच्या लक्षात येतील. त्याचप्रमाणे वरिष्ठांकडून कार्यकर्त्याच्या एखाद्या कामाचे कौतुक झाले, त्याची चूक पदरात घालून वरिष्ठांनी त्याला आपुलकीने समजावले किंवा त्याला आलेल्या अडचणीत मार्ग दाखवला तर त्या कार्यकर्त्याचा वरिष्ठांविषयीचा आदर वाढतोच पण नवनवीन आव्हानं पेलण्याची, नवनवीन कामं करण्याची त्याला ऊर्मीही येते. कारण न सांगता मनातलं कळलंकी विश्वास वाढतो, मनासारखं झालं की आनंद वाटतो.

      ह्या सर्व गोष्टी होण्यासाठी कार्यकर्त्यांना एकमेकांचा सहवास लाभणे, त्यांच्या विचारांची देवाण-घेवाण होणे, एकमेकांच्या तक्रारी/अडचणी जाणून त्या निवारण्यासाठी एकत्र प्रयत्न करणे हे होणे आवश्यक आहे. असे झाले तरच ‘जिवंत संघटना’ तयार होईल. कार्यकर्ता एकमेकांत जेवढा मिसळेल तेवढे संघटन जिवंत होते. मग ते संघटन कोणतेही असो

कार्यकर्त्याच्या अपेक्षा :

·         माणसासारखं वागवावं

·         कामात फेर बदल करावा

·         भेदभाव नको

संघटनेतील इतर सहकारी कार्यकर्ते, वरिष्ठ यांच्याकडून माणुसकीची वागणूक मिळणे कार्यकर्त्याला अपेक्षित असते. जर कोणी सतत अपमान करत असेल, टोचून बोलत असेल तर हे कोणालाच आवडणार नाही. चुका या माणसाकडूनच होतात हे समजून घेऊन अतिशय प्रेमाने त्या कार्यकर्त्याला सांगितले तर त्याला त्याची चूक तर लक्षात येईलच पण तो त्या शक-याशी / वरिष्ठांशी जोडला जाईल.

त्याचप्रमाणे त्याला सतत एकाच प्रकारचं काम दिलं तर नंतर त्याला त्या कामाचा कंताला येईल व एक दिवस तो संघटना सोडून निघून जाईल. कार्यकर्ता निघून जाणं हा संघटनेचा तोटा आहे. कारण ‘येईल त्याला घेतलं पाहिजे व पाहिजे तसं घडवलं पाहिजे’ हे संघटनेचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वरिष्ठांनीच त्याची क्षमता ओळखून, त्याच्यातील सूप्त गुण ओळखून त्याला वेगवेगळ्या प्रकारची कामं देऊन ती त्याच्याकडून पार पाडून घेतली पाहिजेत. यातूनच त्या कार्यकर्त्याला कामातील बदलामुळे कामाचा कंटाळा येणार नाही व त्याला स्वत:ला त्याच्यातील सूप्त गुणांची ओळख होऊ शकेल. तसेच वरिष्ठांनाही त्यांच्या निवडीबद्दल (कार्यकर्ता), त्याच्या कामाबद्दल खात्री वाटेल.

संघटनेत अनेक कार्यकर्ते असतात व संघटनेची अनेक कामे देखील असतात. ती कामे वाटून देताना वर्ण-जाती भेद, लिंगभेद, आर्थिक स्तर असे कोणतेही भेदभाव डावलून जर कार्य केले, सर्वांना सामावून घेऊन कामांचे वाटप केले तर ते कार्य उत्तमरीत्या पार पडू शकते व त्यामुळे कार्यकर्त्यांचे परस्परसंबंध जिव्हाळ्याचे होऊन त्याचा फायदा संघटनेला होऊ शकतो.

या सगळ्याबरोबरच संघटनेची काय कर्तव्ये आहेत ती आपण बघू या.

संघटनेची कर्तव्ये :

·         संघटनेचा पूर्व-इतिहास, कार्य, संघटनेची ध्येय, उद्दिष्टे याबद्दलची स्पष्टता

·         कार्यकर्त्यांचे दायित्त्व, त्यांची कर्तव्ये याची स्पष्टता

·         कार्यकर्त्यामधील दोष, त्रुटी निवारण

·         कार्यकर्त्यामधील सूप्तगुणांना प्रोत्साहन

·         सूक्ष्म निरीक्षण

·         सर्वांना सर्व कामे देऊन परिपूर्ण कार्यकर्ता घडविण्याकडे लक्ष

संघटनेतील वरिष्ठ, पदाधिका-यांनी एखादा नवखा कार्यकर्ता असेल तर त्याला संघटनेचा पूर्व-इतिहास, संघटनेचे कार्य, तिची ध्येये, उद्दिष्टे या सगळ्या गोष्टी माहीत आहेत का? व नसेल तर ती देणे अपेक्षित आहे.

त्याचप्रमाणे कार्यकर्ता म्हणून संघटनेप्रति त्याचे काय दायित्त्व आहे? काय कर्तव्य आहे याचीही जाणीव वरिष्ठांनी त्याला करून देणे गरजेचे आहे.

कार्यकर्त्याच्या कामाचे, स्वभावाचे सुक्ष निरीक्षण वरिष्ठांनी करून त्याच्यावर वेगवेगळ्या जबाबद-या टाकून त्याच्यातील सूप्तगुणांना वाव दिला पाहिजे. एखादं कार्यकर्ता विविध गोष्टी विविध प्रकारे वेगवेगळ्या दृष्टीकोनातून करत असेल तर हा गुण लक्षात घेऊन त्याच्या या गुणवैशिट्याचा प्रचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे परस्परसंबंध सुधारतीलच पण त्या कार्यकर्त्याचा हुरूप वाढेल, उत्साह वाढेल.

पदाधिका-यांनी आईच्या ममतेने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन, त्याचे मन ओळखून, त्याला सन्मान देणे महत्त्वाचे आहे. आई ज्याप्रमाणे सर्व मुलांवर सारखीच माया करते पण त्यांच्यातील गुण-दोष ओळखून, त्यांची गरज ओळखून प्रत्येकाशी त्या त्या प्रमाणे व्यवहार करते त्याचप्रमाणे वरिष्ठांना कार्यकर्त्याची आई होऊन त्यांना आईच्या ममतेने त्यांच्यातील गुण-दोषाची जाणीव करून दिली पाहिजे, त्याची गरज ओळखून योग्य तिथे मदतीचं हात पुढे केला पाहिजे, योग्य मार्गदर्शन केले पाहिजे.

कार्यकर्त्याला आपला आदर्श कोण असला पाहिजे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा आदर्श हा एकच असू शकत नाही पण मग त्या आदर्शाप्रमाणे होण्यासाठी मला काय करावे लागेल? माझ्यात काय सुधारणा करायला हव्यात? याचे अंतर्मुख होऊन कार्यकर्त्याने चिंतन करायला हवे. कारण मी स्वत:मध्ये बदल, सुधारणा केली तर मी इतरांना मार्गदर्शन करू शकतो अशी भावना मनांत बाळगली तर कार्यकर्ता हा ‘स्वत:’ विकसित होतो.

संघटनेत अनेक लोक विविध प्रकारच्या तक्रारी घेऊन त्याचे निराकरण व्हावे या आशेने येतात. यासाठी मुळात संघटनेमध्ये विविध क्षेत्रातील कार्यकर्ते असणे अत्यावश्यक आहे. (उदा. वीज, बांधकाम, रस्तेबांधणी, सार्वजनिक स्वच्छता) विविध क्षेत्रातील अभ्यासू कार्यकर्ता संघटनेत हवा. त्याला त्याच्या क्षेत्रातील बारकावे, अडचणी माहीत असाव्यात. त्यामुळे एखाद्या समस्येतून कसा मार्ग काढता येईल याचे योग्य मार्गदर्शन तो करू शकेल. यामुळे लोकांचा संघटनेवरील विश्वास वृद्धिंगत होईल व संघटनेचे कार्य वाढीस लागून तिची चांगली प्रतिमा लोकांमध्ये तयार होईल व आपोआपच संघटना ‘मोठी’ होईल.

सगळ्यात शेवटी असे म्हणावे लागेल की, संघटनेतील पदाधिकारी, वरिष्ठांनी कार्यकर्त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन व्यापक, सर्वस्पर्शी, सर्वव्यापी ठेवला पाहिजे. त्यासाठी मनात सद्भावना कायम ठेवली पाहिजे. वर सांगितल्याप्रमाणे आत्मचिंतन करून ‘मी’ (स्वत:) पासून बदलांना सुरुवात केली पाहिजे अर्ण स्वत:च्या मनाला जाणून घेतल्याशिवाय इतरांच्या मनाचा ठाव घेता येत नाही. स्वत: वदना सोसल्याशिवाय संवेदना जागी होत नाही. त्यामुळे स्वत:च्या मनाला नियंत्रित करून, त्यावर प्रयत्नपूर्वक चांगले संस्कार करून त्याला घडवावं लागतं, त्याची निर्मलता जपावी लागते. कारण असे संवेदनाशील मनच दुस-याचे मन जाणून घेऊ शकते. म्हणजेच ‘कार्यकर्त्याचे मानस’ जाणून घेऊन त्या कार्यकर्त्याला संघटनेशी कसे जोडून ठेवता येईल, तो संघटनेच्या सर्व आयामांना कसा स्पर्श करू शकेल, त्यासाठी काय करायला हवे हे समजून कार्य करणे व एक परिपूर्ण कार्यकर्ता बनण्यास व बनवण्यास निश्चितच याचा मोठा हातभार लागू शकतो यात शंका नाही.

संघटक हा प्रेरक, उर्जा देणारा, आधार देणारा, अनुभवांची श्रीमंती असणारा असला पाहिजे. ‘मन जुळे तो क्षण भाग्याचा’ हा मूलमंत्र लक्षात ठेऊन सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कार्यरत राहिल्यास वेगळे ‘कार्यकर्ता मानसशास्त्र’ शिकण्याची / समजून घेण्याची काहीच गरज पडणार नाही असा विश्वास वाटतो.

1 comment:

  1. अप्रतिम मनःपूर्वक धन्यवाद

    ReplyDelete

असाही एक व्हाटसप्प ग्रुप

  ग्राहक चळवळीला मार्गदर्शक " खटाव तालुका ग्राहक संरक्षण समिती " व्हाट्सऍप ग्रुप.                                              ...