Sunday, 10 April 2022


 

ग्राहकराजा च्या माध्यमातून कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. त्यात कोल्हापूरच्या 

जुई कुलकर्णी यांनी कार्यकर्ता आणि कुटुंब

हा विषय मांडला. त्यांच्या भाषणाचा  हा सारांश  


कार्यकर्ता आणि कुटुंब या संज्ञांचा विचार / परस्परसंबंध बघण्याआधी त्या संज्ञांचा अर्थ बघू या.

कुटुंब – कुटुंब म्हणजे विवाहसंबंध, रक्तसंबंध, दत्तक विधान या कारणाने एकत्र वास्तव्य          करणा-या व्यक्तींचा समूह होय.

कार्यकर्ता – काम म्हणजे ‘कार्य’ म्हणजेच काम करणारा तो ‘कार्यकर्ता’. कर्मचारी व कार्यकर्ता यातदेखील फरक आहे. कर्मचा-याला तो करत असलेल्या कामाचा मोबदला / पगार मिळतो. परंतु कार्यकर्ता हा स्वयंप्रेरणेने काम करणारा असतो. त्यामुळे त्याला मोबदला / पगार मिळत नाही. परंतु, कर्मचारी हा कार्यकर्ता असू शकतो.

कार्यकर्ता हा कुटुंबातच जन्माला येतो.

कार्यकर्त्याचे काम काय असे विचारले तर ‘लष्कराच्या भाक-या भाजणे’ असे गमतीदार उत्तर देता येईल. त्यामुळे शिवाजी जसा शेजारच्या घरात जन्माला यावा असे वाटते तसेच कार्यकर्ता हा आपल्या घरात नसावा असे वाटते. कारण लोकांचे प्रश्न जाणून घेऊन, त्यांच्या अडचणी जाणून घेऊन, त्यांचे निराकरण विनामोबदला दिवसरात्र जे करतात ते कार्यकर्ते. मग तो शेजारच्याच घरात जन्मावा असे वाटणे स्वाभाविक आहे.

      मुळात कार्यकर्ता का असावा, त्याची गरज का आहे?असा विचार करता ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे’ या पंक्तीचा संदर्भ घ्यावासा वाटतो. कोणतीही संघटना जेव्हा उभारायची असते तेव्हा त्या संघटनेचे ध्येय, उद्दिष्ट साध्य करण्यसाठी, त्या संघटनेची व्याप्ती वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांची गरज असते. ज्याप्रमाणे कृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या हाताच्या करंगळीवर उचलून धरला परंतु त्याला इतरांनी आपापल्या काठ्यांचा आधार दिला (टेकू दिला) त्याचप्रमाणे संघटनेची व्याप्ती वाढविण्यासाठी, तिच्या ध्येयपूर्तीसाठी संघटक, जरी झटत असला तरी त्याला इतरांच्या सहाय्याची आवश्यकता असते, म्हणजेच कार्यकर्त्यांची आवश्यकता असते. किंवा जसं एक लाकडाची काठी कोणीही मोडू शकतो पण जर अनेक काठ्यांची एक मोळी बांधली तर ती तोडणं सहज शक्य होत नाही. त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते एकत्र आले तर संघटना बळकट होण्यास मदत होते.

      आता आपल्याला कळले की कार्यकर्ता का महत्त्वाचा आहे? असा हा कार्यकर्ता कसा असावा याचाही विचार करू या. आपल्याला कार्यकर्त्याच्या वैयक्तिक व कौटुंबिक अशा दोन्ही बाजूंचा विचार करावा लागेल.

कार्यकर्त्याची वैयक्तिक बाजू:

१.      कार्यकर्त्याचा आत्मविश्वास

२.      त्याची परिश्रम करण्याची तयारी

३.      त्याचे संभाषण कौशल्य

४.      त्याची शिस्तप्रियता

५.      वेळेचं महत्त्व

६.      अभ्यासू वृत्ती

याचबरोबर

१.      गोपनीयता पाळण्याची क्षमता

२.      चिकित्सक वृत्ती

३.      त्याला असणारी संघटनेचा पूर्व इतिहास, तत्त्व, ध्येय, उद्दिष्ट याविषयी माहिती

४.      संघटनेबद्दल आपुलकी

५.      कार्यकर्ता जोडणारा आहे का?

६.      पंचदान – वेळ, बुद्धी, श्रम, कौशल्य आणि पैसा (गरज पडल्यास) संस्थेला/ संघटनेला देण्याची इच्छा आहे का?

७.      बहुविध बुद्धिमत्ता (multiple intelligence) 

वरच्या सगळ्या मुद्द्यांचा संकलित विचार केला तर असे लक्षात येते की, पु. ल. देशपांडे यांच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील ‘नारायण’ हा आद्य ‘कार्यकर्ता’ असे म्हणणे वावगे ठरू नये. ‘नारायण’ डोळ्यासमोर आणला तर वरील सर्व स्वभाववैशिष्ट्ये आपल्याला त्याच्यात पहावयास मिळतात व ती समजून घेणेही सोपे जाते. नारायणावर जशी अनेक कामं पार पडण्याची जबाबदारी होती व ती पार पडत असताना आपल्याला नारायणातील परिश्रम करण्याची तयारी, योजनाबद्ध नियोजन, वेळेचं महत्त्व, त्याचा इतरांकडून काम करून घेण्यातील हातखंडा, संभाषण कौशल्य, त्याची निर्णयक्षमता या आणि अशा विविध स्वभावगुणांचं दर्शन होतं त्याचप्रमाणे संघटनेच्या कामात कार्यकर्त्याच्या ठायी ही सर्व स्वभाव वैशिष्ट्ये असणे गरजेचे आहे. कार्यकर्ता जर अभ्यासू वृत्तीचा, चिकित्सक असेल तरच लोकांच्या अडचणी समजून त्यावर योग्य ती उपाययोजना तो सुचवू शकेल. त्याच्याकडे चांगले  संवाद / संभाषण चातुर्य असेल तर तो लोकांशी तर चांगला संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेऊ शकतोच पण त्याच्या सहकार्यांशीही सुसंवाद साधून त्यांच्या कामात येणा-या अडचणी, काही अनुभवाचे बॉल त्यांना सांगून परस्परसंबंध दृढ होण्यास मदत होईल.

   जर कार्यकर्त्यांमध्ये परस्परसंबंध जिव्हाळ्याचे असतील तर संघटनेचे कार्य अधिक उत्तमरित्या चालेल यात शंका नाही. संघटनेच्या दृष्टीकोनातून कार्यकर्त्याचे गुणवैशिष्ट्य बघायचे झाल्यास त्याला संघटनेचा पूर्व इतिहास, संघटनेची तत्त्व, ध्येय, उद्दिष्टे याबद्दल माहिती आहे का? संघटनेच्या कामासाठी त्याची पंचदान देण्याची तयारी आहे का? तो आपल्या संवाद कौशल्याने कार्यकर्ता जोडणारा आहे का? त्याला संघटनेबद्दल आपुलकी वाटते का? तो चिकित्सकवृत्तीचा आहे का? त्याच्याकडे बहुविध बुद्धिमत्ता आहे का व तो त्याचा उपयोग संघटन कार्यात, संघटनेच्या उन्नतीसाठी करू इच्छितो का? यासारख्या गुणांचा विचार करावा लागेल.

   या सर्व गुणांनी संपन्न व्यक्ती कार्यकर्ता असेल तर संघटनेचा विकास, तिची व्याप्ती (वाढण्यासाठी नक्कीच मोलाची गोष्ट आहे) वाढीस लागेल यात शंका नाही.

   परंतु जसे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसेच गुणी, कुशल कार्यकर्ता बनण्यासाठी तो कार्यकर्ता बनण्याआधी सामान्य व्यक्ती असताना त्याच्या लहानपणापासून त्याच्या कुटुंबातून त्याच्यावर कोणते, कसे संस्कार झाले आहेत हे खूप महत्त्वाचे आहे. कारण कुटुंबातून शिस्तप्रियता, वेळेचं महत्त्व, परिश्रमाची सवय, चौकसपणा, मोठ्यांविषयी आदरभाव, भेदभाव न पाळणे, संभाषण चातुर्य, माणसं जोडण्याची कला अशासारखे संस्कार लहानपणापासून त्याच्यावर झाले असतील तर त्याचे हे संस्कार, त्याच सवयी मोठे झाल्यावर त्याच्या कार्यकर्ता बनण्याच्या प्रवासात त्याला खूप उपयोगी पडतात व त्याला उत्तम, कुशल कार्यकर्ता बनण्यास महत्त्वपूर्ण भमिका बजावतात.

   आत्ता आपण बघितले कार्यकर्ता बनण्यापूर्वी कुटुंब कसे महत्त्वाचे आहे त्याचप्रमाणे व्यक्ती कार्यकर्ता बनल्यावर कुटुंब कसे महत्त्वाचे आहे ते आपण बघू या.

   आता हे कुटुंब म्हणजे ‘संघटना’, ‘संस्था’ होय. कार्यकर्ता ज्या संघटनेचा असेल ती ‘संघटना’ म्हणजे त्याचे ‘कुटुंब’ च होय. कुटुंबात जसे अनेक लोक एकत्र राहतात, त्यांच्यात लहान-मोठे असे स्तर असतात (उदा. कुटुंबप्रमुख, कर्तापुरुष – आजी-आजोबा, आई-वडील, मुले) त्याचप्रमाणे संघटनेच्या कुटुंबातदेखील संघटक, पदाधिकारी, कार्यकर्ता असे विविध स्तर असतात. अनेकजणांचे मिळून एक कुटुंब बनते त्याचप्रमाणे अनेक कार्यकर्ते मिळून एक संघटना नावाचे ‘कुटुंब’ बनते.

   कार्यकर्ता जसा त्याच्या घरादाराला वेळ देतो त्याचप्रमाणे त्याने संघटनेला, संघटनेच्या कार्याला वेळ देणे गरजेचे असते. ज्याप्रमाणे तो स्वत:च्या घरी भविष्यासाठी आर्थिक नियोजन करतो त्याचप्रमाणे त्याने संघटनेच्या आर्थिक व्यवहारात लक्ष देणे आवश्यक आहे. कारण आर्थिक स्थिरता आली की आपोआपच संघटनेच्या कार्याला बळ मिळेल. कार्यकर्त्या कुटुंबातील अनेकजणांचे भिन्न स्वभाव, भिन्न भावना जशा जपतो त्याचप्रमाणे संघटनेतील अनेक कार्यकर्ते, त्यांचे भिन्न स्वभाव, भिन्न मते यांचा समन्वय साधून त्यातून योग्य मार्गदर्शन करून संघटनेचे कार्य पुढे चालू ठेवणे गरजेचे आहे. तो कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता सर्वांच्या मताला, वरिष्ठांना मान देणारा असावा. त्याचे काम पारदर्शी असावे. कार्यकर्ता काम करत असताना त्याला अनेकदा त्याचे सहकारी, वरिष्ठ, पदाधिकारी यांच्या कुटुंबात कामानिमित्त जाण्याचीही वेळ येते. अशा वेळेस त्या कुटुंबाच्या भावना जाणणारा, त्यांच्याशी सुसंवाद साधणारा, योग्यरित्या प्रतिसाद देणारा कार्यकर्ता असेल तर अर्थातच त्याचे त्या कुटुंबाशीही स्नेहपूर्ण संबंध प्रस्थापित होतात. त्याची चांगली प्रतिमा तयार होते. यातूनच त्याचा व्यक्ती म्हणून विकास होतो व कार्यकर्ता म्हणूनही.

   आपण आत्ता कार्यकर्ता आणि कुटुंब या सगळ्यावर विचारमंथन केले पण त्यात अजून एक महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे ‘स्त्री’ कार्यकर्ता. स्त्री ही जन्मजातच कार्यकर्ता असते. ती दैनंदिन व्यवहारातदेखील असंख्य पूरक कामे करीत असते. ती एकाचवेळी अनेक भूमिका, त्यासाठीची कर्तव्ये पार पडत असते. त्यासाठीचे निर्णय घेत असते. स्त्री कार्यकर्त्यांच्या बाबतीत स्थळ – काळाच्या काही मर्यादा असतात. तरीही त्या पाळून स्त्रिया उत्तम कार्य करू शकतात. धार्मिक, सामाजिक, राजकीय अशा सर्वच क्षेत्रात कार्यकर्त्यांची गरज पडते. ज्याप्रमाणे कुटुंबाचा गाडा हाकताना स्त्री – पुरुष दोघांचाही सहभाग असतो त्याचप्रमाणे संघटनेचा गाडा हाकताना, त्याची उद्दिष्टे साध्य करीत असताना स्थळ – काळाची बंधने, मर्यादा पाळून स्त्री कार्यकर्ताही सहभागी होऊ शकते. 

स्त्री कार्यकर्त्यांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी :

·         कुटुंबात ज्याप्रमाणे मनमोकळा संवाद केला जातो तसाच मनमोकळा संवाद करावा.

·         काम करताना तर कोणी काही बोलले तर छोट्या छोट्या गोष्टी मनावर न घेता त्याचे चिंतन करावे.

·         एखाद्याला दुरुत्तर न करता त्यावर मात करून कृती करावी.

अशा प्रकारे कार्यकर्ता जसे वैयक्तिक आयुष्यात स्वत:च्या कुटुंबात जसजशा जबाबदा-या पार पाडतो जसे, निर्णय घेतो, सर्वांमध्ये समन्वय राखतो तसेच ‘संघटने’ च्या ‘कुटुंबात’ देखील या गुणांचा अवलंब केला तर कार्यकर्त्या बरोबरच त्याचे ‘कुटुंब’ देखील मोठे होईल यात काही शंका नाही. कार्यकर्तेएकमेकांशी घट्ट जुळले की संघटनेचे ‘कुटुंब’ निर्माण होते. कुटुंब – कुटुंब जुळली की कार्यकर्ता जुळायला वेळ लागत नाही व यातूनच संघटनेचा विस्तार होण्यास गती मिळते. ‘माझं’ असं काही न राहता ‘आपलं’ होतं व ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा परम विकासाचा कळस गाठण्याचं स्वप्न देखील प्रत्यक्ष साकार होऊ शकेल असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

 

No comments:

Post a Comment

असाही एक व्हाटसप्प ग्रुप

  ग्राहक चळवळीला मार्गदर्शक " खटाव तालुका ग्राहक संरक्षण समिती " व्हाट्सऍप ग्रुप.                                              ...