Wednesday, 25 May 2022


 

वीज, अपघात, काळजी आणि नुकसान भरपाई

                                   श्री. प्रशांत पुजारी-कोल्हापूर

अपघात झाल्यावर नुकसान भरपाई मिळणेसाठी विविध पुरावे देऊन पाठपुरावा करत बसण्यापेक्षा अपघात न होण्यासाठी छोट्या – मोठया गोष्टींची, स्वत:च्या व इतरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून व्यवस्थित काळजी घेतल्यास होणारे गंभीर वीज अपघात ग्राहक निश्चितपणे टाळू शकतो. शेवटी सर्व प्रकारच्या विद्युत अपघाताबद्द्लची नुकसान भरपाई विद्यत पुरवठा करणाऱ्या कंपनीकडे करता येते. तेथे ग्राहकाचे समाधान न झाल्यास जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे दाद मागता येऊ शकते. 

     मानवी जीवनात अन्न, पाणी, वस्त्र, निवारा याबरोबर सध्याच्या काळात वीजेचीही अत्यंत आवश्यकता भासत आहे. परंतु वीजेचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागतो. कारण आपण अनेक ठिकाणी विजेमुळे होणारे अनेक गंभीर अपघात पाहत असतो. विद्युत अपघात हे प्रामुख्याने मनुष्यहानी, स्थावर जंगम मालमत्ता व पाळीव प्राणी इ. बाबतीत होत असतात. या घटकांचे नुकसान विद्युत अपघाताने झाल्यास संबंधित वीज पुरवठा करणा-या कंपनीकडे नुकसान भरपाई मागता येते.

विजेचा झटका बसून व्यक्ती किंवा प्राणी दगावल्यास सर्वात प्रथम जवळच्या वीज पुरवठा करणा-या कंपनीच्या शाखा कार्यालयात / कर्मचा-यांना कळवावे. तसेच, पोलीस स्टेशनला कळवणे आवश्यक आहे. पोलीस पंचनामा होईपर्यंत मृतदेह घटनास्थळापासून हलवू नये. विद्युत अपघातातील व्यक्ती किंवा प्राणी यांच्या पोस्टमार्टमचे अहवाल, पोलीस पंचनामा इत्यादीच्या प्रति नुकसान भरपाई दाव्यासाठी आवश्यक आहेत. वीजपुरवठा करणारे सर्व खांब, तारा, सर्व्हिस लाईन व मीटर पर्यंत काही दोष निर्माण होऊन झालेल्या अपघातास विद्युत पुरवठा करणारी संबंधित कंपनी जबाबदार असते.ग्राहकाच्या फिटिंगमधील दोष अथवा उपकरणांच्या दोषामुळे अपघात झाल्यास संबंधित कंपनी जबाबदार नसते. विद्युत अपघाताची माहिती मिळताच वीज कंपनीचे अधिकारी / कर्मचा-यांनी अपघात स्थळी ताबडतोब जाऊन वीज पुरवठा बंद झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच जवळच्या रहिवाशांबरोबर संपर्क साधून अपघाताच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे. जवळच्या पोलीस स्टेशनला कळवून विद्युत निरीक्षक यांनाही कळवणे बंधनकारक आहे. विद्युत निरीक्षक अपघातस्थळी पाहणी करून, विद्युतवाहिन्या पोलीस पंचनामा, इतर निरीक्षणे करून अधिकारी / कर्मचारी यांची जबाबदारी निश्चित करून तसा अहवाल देतात. नैसर्गिक आपत्ती व अपघातातील व्यक्तीचा काही दोष नसताना वीज पुरवठा करणा-या व उपकरणे यांच्या संपर्कात आल्याने अपघात होऊन मृत्यू झाल्यास किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास वीज कंपनीकडे नुकसानभरपाई मागता येते.

विद्युत कंपनीच्या प्रशासकीय परिपत्रकानुसार माणसांना आणि प्राण्यांना प्राणांतिक अपघात झाल्यास आर्थिक नुकसानभरपाई दिली जाते माणसांना अप्राणांतिक अपघात झाल्यास रु. २.५ लाख नुकसानभरपाई देण्यात येते. जर माणसांना प्राणांतिक अपघात झाला तर मृत व्यक्तीचे वय आणि कमाईची क्षमता याचा विचार करून रु. ४ लाख इतकी नुकसानभरपाई दिली जाते. अशा अपघातात इतर संबंधित लोकसुद्धा प्राणांतिक अपघातासाठी रु. २०,००० आणि अप्राणांतिक अपघात झाल्यास रु. १००० ते रु. ५००० इतक्या तातडीच्या आर्थिक मदतीसाठी दावा करू शकतात. प्राण्यांना अप्राणांतिक अपघात झाल्यास रु. २००० ची आर्थिक मदत करण्यात येते. (एस.एस.ई.डी.सी.एल.प्रशासकीय परिपत्रक क्र. ५३३ दि. ९ मार्च २०१६ आणि एस.एस.ई.डी.सी.एल.प्रशासकीय परिपत्रक क्र. १९२ दि. २० नोव्हें २००८) सुरुवातीला दिलेली तातडीची मदत ही नंतरच्या भरपाईच्या रकमेतून वळती केली जाते. बैल, गाय, म्हैस, घोडा इ. पाळीव प्राणी मृत झाल्यास जास्तीतजास्त रु. ३०,०००/- इतकी नुकसानभरपाई मिळू शकते आणि बकरा, शेळी, गाढव, वासरू इ. प्राणी मृत झाल्यास जास्तीतजास्त रु. ३००० इतकी नुकसानभरपाई संबंधित  वीज कंपनीकडून मिळू शकते.

त्यासाठी पोलीस पंचनामा, मृत्यू झाला असल्यास वैद्यकीय अधिका-यांच्या पोस्टमार्टमचा अहवाल, सक्षम महसूल अधिका-यांचा वारसा दाखला, पोलिसांचा एफआयआर, कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास शासकीय दवाखान्यात औषधोपचाराचे दाखल खर्चाचे बिल, पावत्या तसेच अपघातातील मृत प्राण्याबाबतीत पशु वैद्यकीय अधिका-यांचा किंमतीबाबतचा दाखला इ. कागदपत्रे जोडून वीज पुरवठा करणा-या स्थानिक उपविभागीय कार्यालयास नुकसानभरपाई साठी अर्ज करता येतो.

 विद्युत अपघाताचा अहवाल देण्यासाठी उर्जा मंत्रालयाने ‘फॉर्म –एफ’ नावचा एक फॉर्म प्रसिद्ध केला आहे. य अधिसूचनेनुसार अपघाताची सूचना विद्युत निरीक्षकाला देण्याचे काम ग्राहक किंवा कनिष्ठ अभियंत्यापेक्षा खालच्या पदावर नसलेला कंपनीचा कोणताही कर्मचारी फॉर्म – एच्या नमुन्यानुसार करू शकतो. विद्युत अपघात घडल्यापासून विद्युत निरीक्षकाला २४ – ४८ तासांच्या आत त्याची सूचना देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील सर्व वीज निरीक्षकांची विभागावर संपर्क माहिती महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. 

 

Monday, 23 May 2022




संघटना वाचलीच पाहिजेत 

 

      सर्वसाधारणपणे भारत देशामध्ये अनेक संघटना, संस्था कार्य करत असतात. संघटना संघटनांमध्ये फरक असतो. काही वेळेला असं असतं एखादी मातृ संघटना असते व त्या संघटनेला कुठेतरी विरोध करण्यासाठी दुसरी संघटना उभी केली जाते. त्यांच्यामधला द्वेष वाढत जातो. मात्र मातृसंघटना वाढते हे पाहवत नाही म्हणून दुसरी संघटना उभी राहिलेली असते. त्या संघटनेतून एखाद पिल्लू म्हणून सोडलं जातं. आणि त्याच्या मार्फत मात्र संघटनेला धोका कसा होईल? भविष्यात मातृ संघटनाच कशी बंद पडेल? यालाच लक्ष केले जाते.

       पुढे काय होतं, तो द्वेष हा वाढत जातो. आणि या द्वेषातून एकच लक्ष्य डोळ्यासमोर असते की मातृ संघटना संपवणे. कदाचित याची काहींनी सुपारी जणू घेतलेली असते आणि मग जे काही घडतं ते वेगळंच.पण आपल्याला आपली संघटना टिकवायची असेल, आपली संस्था टिकवायची असेल तर आपण सावधगिरीने पावले उचलावीत. मातृ संघटनेच्या तत्वाला धोका पोचणार नाही हे पाहिलं पाहिजे हेच मला या लेखातून सांगायचे आहे.कारण सध्या अशी मनमानी बर्याच ठिकाणी चालू आहे.

    बंधूंनो म्हणजे कस होत ते थोडसं स्पष्टीकरण करतो. एखादी संघटना किंवा संस्था असते. या संघटनेला पॅरेलल म्हणून दुसरी संघटना उभी केली जाते. आणि मातृ संघटना वाढूच नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. म्हणजेच नेमकं काय घडत? तर बघा दुसऱ्या संघटनेतून मूळ संघटनेमध्ये एखादा माणूस पाठवला जातो. त्याला बळ दिलं जातं, आर्थिक पाठबळ पण दिलं जातं. त्याला वरपर्यंत चढवल जात. त्याला पाहिजे ती पद दिली जातात. हे सगळे करायचे काम या उप संघटनेकडून अप्रत्यक्षरीत्या होत असतं. आणि यामागचा उद्देश काय तर मातृसंघटना संपवणे हे व्रतच जणू त्यांनी घेतलेले असते.माझ्या भाषेत सुपारी घेतली म्हटल तर वावग ठरणार नाही.

      काही संघटनांमध्ये या संघटनेचे लोक पाठवले जातात. ते यामुळेच संघटनेत वरिष्ठांचा किंवा अन्य काही लोकांचा विश्वास संपादन करून एखाद्या मोठ्या चांगल्या पदावर बसतात. त्या पदावर बसल्यानंतर सुरुवातच अशी होते की यामुळे मूळ संघटनेत असलेली व ज्यांनी तत्त्व सांभाळलेली आहे, त्यांच्याकडे तत्व आहेत अशा लोकांनाच आगोदर दूर केलं जात. म्हणजे  काम करायला मार्ग मोकळा होतो. आता एकदा का ही लोक मूळ संघटनेतून दूर गेले म्हटली की सगळी संघटना आपल्या ताब्यात आली. असं त्या व्यक्तीला वाटत असतं. पण पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची या परिस्थितीप्रमाणे अवस्था झालेली असते. हे त्याच्या लक्षात येत नाही. पुढे आलेली व्यक्ती या मूळ संघटनेमध्ये महत्वाच्या पदावर सगळा ताबा घेता आला पाहिजे अशी माणसे उभी करते. स्वतःच्या कानाला लागतील अशी माणसे उभी करते. थोडक्यात काय तर चाड्या लावणाऱ्या माणसांना स्थान दिले जात. मग तिकडे संघटनेचे काहीही होवो.

    काही कालांतरानंतर या संघटने मध्ये कोण काय करते, कोण काय करते? या सगळ्याचा अभ्यास केला जातो. आणि बरोबर आपल्याला डोईजड होतील अशी तत्त्वनिष्ठ माणस ओळखून त्यांना वेळोवेळी नाराज कसं करता येईल ? बाजूला कसे सरकवता येईल हे पाहिले जाते. याचा परिपूर्ण अभ्यास केला जातो. वेळोवेळी बाजूला कसे ठेवता येईल याचाच विचार या संघटनेत आलेल्या लोकांनी केलेला असतो. काही कालावधीनंतर काय होतं आपोआपच जुनी माणस संघटनेमध्ये दुखावली जातात. आणि त्या ठिकाणी आपला माणूस कसा बसेल याचाच विचार केला जातो ?  एवढंच नाही तर त्या संघटनेमध्ये असणारे पदाधिकारी हे बहुतांशी आपले कसे असतील ? आपल्या हातातलं खेळणं कसे असतील ? आपण सांगू ती ऐकणारे कसे असतील ? याचा परिपूर्ण अभ्यास करून अशीच माणसं त्या ठिकाणी बसवली जातात. हे वास्तव आहे.

     मग पुढे काय होतं तर अशा नाराज झालेल्या लोकांमुळे संघटना कमजोर होते. भविष्यामध्ये कुठल्याही क्षणी हे लोक दुसऱ्या संघटनेमध्ये जातात. तिथे स्वतःचे स्थान बळकट करतात, स्वतःच्या खुंटा बळकट करतात. आणि तिथेच रहाणं पसंत करतात.मात्र तत्वाशी एकनिष्ठ असलेले शांतच राहण्याच पसंत  करतात.

     तात्पर्य काय तर संस्था,संघटनेत बाहेरच्या संघटनेतून येऊन आपल्या डोक्यावर बसणारी माणसं वेळीच ओळखली पाहिजेत. अनेक संघटनांमधून, संस्था मधून आलेला अनुभव आहे. अनेक संघटनांचा केलेला अभ्यास आहे. यातून हे लिखाण केले आहे. दुर्दैवाने हे जर कोणाच्या बाबतीत खरं घडत असेल तर तो अपघात समजावा.

   पण बांधवांनो एवढच सांगतो आपली संघटना,संस्था सांभाळा. याच्यामध्ये बाहेरून आलेला आपल्यावर कोणी राज्य करत तर नाही ना? नाही तर व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. अशी याआधी भारताची जी अवस्था झाली तीच अवस्था भविष्यात होणार आहे. आपल्यातून आपले मूळतत्व मोडकळीस आणून, आपल्या तत्त्वांना तिलांजली देऊन, दुसऱ्यासाठी व दुसर्याच्या जीवावर संघटना मोठे करण्याचा प्रयत्न करणारे सुपारी किलर वेळीच ओळखा एवढंच माझं म्हणणं आहे.काही झाल तरी आपली संघटना,संस्था वाचलीच पाहिजे


असाही एक व्हाटसप्प ग्रुप

  ग्राहक चळवळीला मार्गदर्शक " खटाव तालुका ग्राहक संरक्षण समिती " व्हाट्सऍप ग्रुप.                                              ...