ग्राहक चळवळीला मार्गदर्शक " खटाव तालुका ग्राहक संरक्षण समिती " व्हाट्सऍप ग्रुप. शब्दांकन - प्रा.नागनाथ स्वामी,सचिव,जागृत ग्राहक राजा संस्था,महाराष्ट्र राज्य.
विविध संघटनांमध्ये कार्य करत असताना मागील 10 - 15 वर्षांपासून ग्राहक चळवळीशी जवळून संपर्क आला. येथे काम करत असताना हेही ध्यानात आले की ग्राहकांच्याही समस्यांची व्याप्ती खूप मोठी आहे.
आदरणीय ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या अथक प्रयत्नांतून शासनाने या विषयीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आणला,तसेच देश पातळीपासून ते अगदी तालुका स्तरावर ग्राहक समस्यांचा निपटारा व्हावा,त्यांना न्याय मिळावा म्हणून व्यवस्था निर्माण केली. ही व्यवस्था निर्माण झाल्यानंतर ग्राहक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. ग्राहकाला योग्य मोबदला, सेवा, न्याय व समाधान मिळवून देणे हे ग्राहक कार्यकर्त्यांचे प्रथम उद्दिष्ट ठरले. त्यातूनच विविध स्तरावर कार्यकर्ते सहभागी होऊन ग्राहक चळवळीत कार्य करू लागले. या कार्यकर्त्यांना तालुका स्तरावरील " तालुका ग्राहक संरक्षण समिती " मध्ये काम करण्याची संधी उपलब्ध झाली व येथे येणाऱ्या छोट्या मोठया ग्राहक समस्यांना न्याय मिळवून देण्याचे ही समिती एक आशास्थान ठरले. अशीच सातारा जिल्ह्यातील " खटाव तालुका ग्राहक संरक्षण समिती" होय.
या समितीकडे येणाऱ्या तक्रारींचे वाढते प्रमाण, विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध अपुरे मनुष्यबळ, वेळ व सोयी सुविधांचा याचा विचार करून या तक्रारींचा निपटारा होऊन ग्राहकांना त्वरित न्याय मिळावा यावर साधक बाधक विचार करून समितीतील जागृत ग्राहक राजाचे प्रा.नागनाथ स्वामी यांनी विद्याधर कुलकर्णी, डॉ.पी.डी.कुलकर्णी, मंदार, विनोद लोहार, प्रा.अजय शेटे व मंदार जोशी व अन्य काही सदस्य यांचेशी चर्चा करून तत्कालीन तहसीलदार किरण जमदाडे यांचेकडे आपला तालुका समितीचा व्हाट्सऍप ग्रुप तयार करण्याची कल्पना मांडली. ती त्यांनी मान्यही केली. परंतु काही कारणांमुळे ती अस्तित्वात येऊ शकली नाही. मात्र नंतरच्या तहसीलदार तथा अध्यक्षा श्रीम. बाई माने हजर झाल्यानंतर २६ डिसेम्बर २०२३ रोजी "राष्ट्रीय ग्राहक दिना" चे औचित्य साधून महाराष्ट्रातील ग्राहक चळवळीला आदर्श ठरावा असा "खटाव तालुका ग्राहक संरक्षण व्हाट्सऍप ग्रुप" अस्तित्वात आला. माझ्या माहिती प्रमाणे अश्या पद्धतीचा हा महाराष्ट्रातील पहिलाच ग्रुप असावा.
हा ग्रुप योग्य दिशेने व प्रभावीपणे कार्यरत राहावा यासाठी सर्व संमतीने काटेकोर नियमावली करण्यात आली व सर्व सदस्यांनी याचे कटाक्षाने पालन करण्याचे मान्य केले,
ती नियमावली अशी – *सदरचा ग्रुप हा फक्त आणि फक्त ग्राहक हिताच्या उद्देशाने निर्माण करण्यात आला आहे. यावर फक्त ग्राहक संबधी येणाऱ्या समस्या मांडून त्यावर न्याय मिळावा, विषयाशी संबंधित प्रशासकीय अधिकारी,सेवा देणाऱ्या संस्था यांना त्यावर अभ्यास करून निर्णय देता यावा. ग्राहक, प्रशासन व सेवा संस्था यांचा वेळ वाचून समस्यांची त्वरित सोडवणूक व्हावी ही अपेक्षा आहे.
*कृपया यावर अन्य कोणतेही मेसेज पाठवू नयेत,असे मेसेज आल्यास संबंधित सदस्यास कोणतेही कारण अथवा सवलत न देता लगेच ग्रुप
मधून काढून टाकण्यात येईल.
* सदस्यांनी आपल्याकडे आलेल्या ग्राहक अडचणी योग्य
नमुन्यात आपल्याकडे घेऊन त्या ग्रुपवर पाठवाव्यात म्हणजे ग्राहक संरक्षण समितीच्या
मासिक सहविचार सभेत संबंधित निर्णय देतील.
* मासिक सभेची सूचना ग्रुपवर पाठविण्यात येईल,त्यानुसार आपण सभेस यावे. याशिवाय वेळोवेळी प्रासंगिक सूचना ग्रुपवर देण्यात
येईल.
* ग्राहक हिताच्या (उदा. ग्राहक संरक्षण कायदा माहिती,ग्राहक संबधी शासकीय जी आर. न्यायालयीन निवाडे, तक्रार अर्जाचे नमुने, ग्राहक हिताची माहिती
देणाऱ्या बातम्या, तालुका स्तरावरील ग्राहक समस्या इत्यादी )पोस्ट शिवाय
या ग्रुप वर इतर कोणतीही पोस्ट टाकू नये.अशी असंबंधीत पोस्ट आल्यास पोस्ट
टाकणाऱ्या सदर सदस्यास ग्रुप मधून त्याक्षणी काढून टाकण्यात येईल याची सर्वांनी
नोंद घ्यावी.
* ग्राहक संघटनांचे पदाधिकारी व इतर सदस्य यांना आपणाकडे
येणाऱ्या तक्रारी विशिष्ट नमुन्यात दोन प्रतीत घ्याव्यात. सदरची तक्रार या ग्रुपवर
दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी होणाऱ्या मिटिंग पूर्वी किमान ७ दिवस पाठवावी. म्हणजे
विषयाशी संबंधित प्रशासकीय अधिकारी मासिक
मिटींगला येतानाच सदर तक्रारींचा परिपूर्ण
अभ्यास करून येतील, त्यामुळे सर्वांचाच वेळ वाचेल व तक्रारींचे निराकरण करणे सोपे होईल.
* प्रशासकीय अधिकारी यांना ग्राहक संरक्षण समितीच्या मासिक मिटींगला कार्यालय प्रमुखानीच हजर राहणे बंधनकारक आहे. काही अपवादात्मक परिस्थितीत आपल्या कार्यालयातील जबाबदार प्रतिनिधीस पाठवावे.परंतु प्रतिनिधीने मिटिंग मधील तक्रारीचा अहवाल प्रमुखास द्यावा व त्यावर योग्य ती कार्यवाही करून पुढील मिटिंग मध्ये ती स्पष्ट करावी.
*ग्रुपवर आलेल्या तक्रारी पाहून तक्रारींचा सविस्तर अभ्यास करून त्यावर योग्य
ती कार्यवाही करावी, मिटिंग मध्ये माहिती द्यावी. काही कायदेशीर अडचण असेल तर
किंवा तक्रारदारांकडून आणखी माहिती व
कागदपत्रे हवी असतील तर सदर तक्रारदाराकडून मागवून घ्यावी.
* शक्यतो जास्तीत जास्त तक्रारींचा सत्वर निपटारा
होईल हे जाणीवपूर्वक पाहावे.याबाबत ग्राहकाची विनाकारण नाडणूक व त्रास होऊ नये, याची दक्षता घ्यावी.याबाबत ग्राहक संरक्षण समिती अध्यक्षांचा निर्णय अंतिम
राहील.
*मिटींगला
गैरहजर अधिकाऱ्यांना प्रथम सूचना दिली जाईल
व पुन्हा असे घडल्यास नंतर कारवाई
केली जाईल.
* सर्वांसाठी अत्यंत महत्वाची सूचना : सर्व संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांना
मासिक मिटिंग दर महिन्याच्या तिसऱ्या मंगळवारी होईल. सदर दिवशी सुट्टी आल्यास
त्यानंतरच्या कार्यालयीन कामकाजा दिवशी सकाळी ११ वाजता सुरू होईल.
*मिटिंगची नोटीस याच ग्रुपवर पाठवली जाईल. व्यक्तिशः
पाठवली जाणार नाही प्रत्येकाने ती पहावी व मिटींगला वेळेवर उपस्थित
राहावे.
*मिटिंग वेळेतच होईल, उशिरा येणाऱ्या ग्राहक, संघटना पदाधिकारी यांनी नंतर त्यासंबंधी प्रश्न उपस्थित करून वेळेचा अपव्यव
करू नये.
* सर्वात महत्वाचे म्हणजे मिटिंग मध्ये कोणीही असंवैधनिक भाषेचा वापर करू नये. आपल्या तालुक्यातील ग्राहक संरक्षण चे कार्य उत्तम व आदर्श ठरावे यासाठी आपणाकडून सहकार्याची अपेक्षा.
वेळोवेळी होऊ घातलेल्या
निवडणूक आचार संहितांचा कालावधी वगळता या समितीच्या नियमितपणे बैठका होतात,त्यामध्ये विविध प्रकारच्या अनेक ग्राहक तक्रारींचा निपटारा होऊन तक्रारदार
ग्राहकाला न्याय देण्याचा प्रयत्न समिती करत असते. ज्या तक्रारींच्या बाबतीत
पुरावे व कागदपत्रांची गरज असते,ती मागवली जातात,पण एक मात्र खरे की,जास्तीत जास्त तक्रारींचा निपटारा जागेवरच केला जातो.सर्व सदस्य सुद्धा
त्यासाठी सहकार्य करतात.
एकूणच अश्या पद्धतीचा ग्रुप निश्चितच ग्राहक चळवळीला मार्गदर्शक ठरेल हा विश्वास वाटतो.