ग्राहक फसवणूक व उपाय
आपल्या रोजच्या
आयुष्यात आपण एखादी वस्तू विकत घेतो, सेवा वापरतो, ऑनलाइन खरेदी करतो. यामध्ये ग्राहकाचा विश्वास हीच मोठी
ताकद असते. पण नेहमीच हा विश्वास टिकतो असे नाही. अनेक वेळा ग्राहक फसवले जातात.
भ्रामक जाहिराती, बनावट सवलती, निकृष्ट दर्जाच्या वस्तू, ऑनलाईन स्कॅम्स या सगळ्या
गोष्टी आपल्या नजरेसमोर रोज घडत असतात. म्हणूनच ग्राहकांनी स्वतः जागरूक राहणे आणि
आपल्या हक्कांची जाणीव ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
ग्राहक फसवणुकीचे प्रकार
1. भ्रामक जाहिरात- टीव्ही, रेडिओ, सोशल मीडिया यावर अनेकदा
वस्तू किंवा सेवेबद्दल अवास्तव दावे केले जातात. उदाहरण : "१० दिवसांत वजन १० किलोने कमी", "हे तेल वापरा आणि केस
गळणे कायमचे थांबेल" अशा जाहिराती.
2. बनावट सवलती व
ऑफर्स- दुकानांमध्ये किंवा ऑनलाइन "५०% सूट", "Buy 1 Get 2 Free" असे बोर्ड
लावलेले दिसतात. प्रत्यक्षात आधीच किंमत वाढवून नंतर सूट दाखवली जाते.
3. गुणवत्तेत तडजोड - पॅकेजिंग आकर्षक पण
आतल्या वस्तू दर्जाहीन असतात. उदा. गहू पीठात भुसा किंवा इतर मिश्रण, ब्रँडेड वस्तूंची नकली
कॉपी.
4. ऑनलाईन फसवणूक- नकली वेबसाईट्सवरून खरेदी, मोबाईलवर आलेल्या लिंकवर
क्लिक करून पैसे गायब होणे. नॅशनल सायबर
क्राईम पोर्टलच्या माहितीनुसार २०२३ मध्ये फक्त ऑनलाइन खरेदी फसवणुकीच्या ५०,००० हून अधिक तक्रारी
आल्या.
5. चिट फंड व आर्थिक
फसवणूक - "दुहेरी नफा", "जलद श्रीमंती" अशा
आश्वासनांवर लोक पैसे गुंतवतात. नंतर संपूर्ण रक्कम बुडते. सहारा, रोज व्हॅली, पर्ल्स यांसारख्या मोठ्या चिट फंड घोटाळ्यांमध्ये लाखो लोक
फसले.
फसवणूक टाळण्यासाठी उपाय
1. 1 जागरूक खरेदी –. खरेदी करताना नेहमी पावती घ्या व जपा.
वस्तूवरील MRP, उत्पादन तारीख, एक्सपायरी तपासा.
2. गुणवत्ता चिन्हे
तपासा - ISI, Agmark, FSSAI, Hallmark यासारखी मानांकन चिन्हे
असल्यास वस्तू विश्वासार्ह असते.
3. ऑनलाईन खरेदीसाठी
सुरक्षितता --
* फक्त अधिकृत वेबसाईट्स/ॲप्स वापरा.
* अनोळखी लिंक किंवा मेसेजवर क्लिक करू नका.
* कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय वापरल्यास जोखीम कमी
होते.
4. जागरूकता पसरवा---आपल्या मित्रपरिवारात व कुटुंबात अनुभव शेअर
करा.
समाजमाध्यमांवर योग्य माहिती द्या.
फसवणूक झाल्यास काय करावे?
सर्वात आधी विक्रेत्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवा.
समाधान न झाल्यास : राष्ट्रीय ग्राहक
हेल्पलाईन : 1800-11-4000
ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी वेबसाइट : consumerhelpline.gov.in
ग्राहक मंच / राज्य आयोग / राष्ट्रीय आयोग येथे तक्रार दाखल
करता येते.
तक्रार करताना पावती, बिल,
जाहिरात यांसारखे
पुरावे आवश्यक असतात.